छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना मिळणार हिमरु शाल निर्मितीचे प्रशिक्षण, गुरुवारपासून प्रारंभ; वाचा सविस्तर तपशील


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील महिलांना हिमरु शाल निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमास गुरुवारपासून (८ फेब्रुवारी) प्रारंभ होत आहे, असे प्रकल्प अधिकारी विनोद तुपे यांनी कळवले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकासात ‘महिला उद्योजकता महत्वाचा स्त्रोत मानली गेली आहे. महिला उद्योजक समाजामध्ये व्यवस्थापन, संघटन व व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये निरनिराळे आयाम प्रस्तुत करीत आहेत. तथापि, महिलांनी परिचालित केलेल्या उपक्रमांची संख्या २० टक्के पर्यंत वाढावी या उद्देशाने राज्यातील महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण २०१७ राबवले जात आहे. या धोरणाअंतर्गत महिलांचा उद्योजकतेमध्ये मोठा सहभाग होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील पहिला जिल्हा म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे महिलांसाठी विशेष प्रकल्प राबवण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगरची(औरंगाबाद) ओळख असणारी हिमरु शाल या लुप्त होत असलेल्या उद्योगास पुनर्जिवित ठेवणे हा मुख्य उद्देश आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सर्व समावेशक विकासासाठी महिलाचलित उपक्रमांद्वारे आर्थिक व सामाजिक बदल घडवण्यास प्रोत्साहन देणारे जागतिकदृष्ट्या सक्षम केंद्र बनवणे व महिला उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्माण करणे, या दृष्टिकोनातून जिल्ह्यात प्रथमतः नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत महिलांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या अंतर्गत दोन प्रकारचे प्रशिक्षण असून हिमरू शाल बनवण्याचा तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम १ महिना कालावधीचा असून यात निवड झालेल्या महिलासाठी हिमरू शाल निर्मितीचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम १८ दिवसांचा असून यात उद्योजकीय अभ्यासक्रम आहे. त्यात  विपनन व विक्री कौशल्य, ग्राहकांशी सवांद, मार्केटिंग, उद्योगाचे व्यवस्थापन, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास असे उद्योजकीय अभ्यासक्रम होणार आहे.

एक दिवसीय उद्योजकीय परिचय मेळाव्याचे वेळापत्रक

  • गुरुवार, दि.८ रोजी दु. १२.३० वा., स्थळः ग्रामपंचायत हॉल, बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

(संपर्क-कार्यक्रम आयोजक अमित लोंढे मोबाइल क्रमांक- ९६०४३०४६६८ सौ. भारती सोसे, प्रकल्प अधिकारी मोबाईल क्रमांक- ९४०३६८३१७३)

  • शनिवार, दि. १० रोजी दु. १२.३० वा.,  स्थळ-चंपा भवन हॉल, विहामांडवा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर.

(संपर्क-कार्यक्रम आयोजक सौ. नयना गवळी मोबाइल क्रमांक- ८३७९००१२६३ सौ. प्रतिभा निमकर, जिल्हा प्रकल्प समन्वयक मोबाईल क्रमांक- ९०२८०५६८०० )

  • सोमवार, दि.१२ रोजी दु. १२.३० वा., स्थळ-पंचायत समिती हॉल, पैठण, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

(संपर्क-कार्यक्रम आयोजक गंगावणे मोबाईल क्रमांक- ९८२२८२४१२६ व प्रकल्प अधिकारी विनोद तुपे मोबाइल क्रमांक- ९०४९२२८८८८)

  • शुक्रवार, दि. १६ रोजी दु. १२.३० वा., स्थळ- एमसीईडी, मुख्य कार्यालय, रेल्वेस्टेशन एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर

(संपर्क- विनोद तुपे, प्रकल्प अधिकारी मोबाईल क्रमांक- ९०४९२२८८८८)

या प्रशिक्षणात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे आणि उद्योजकता विकास केंद्राचे कार्यकारी संचालक बी.टी. यशवंते यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!