नागपूरः जंग जंग पछाडून राज्याची सत्ता हस्तगत करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांचा गृह जिल्हा नागपुरातच धक्कादायक नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांपैकी एकाही पंचायत समितीत भाजपला एकही सभापतिपद जिंकता आलेले नाही. या १३ पंचायत समित्यांपैकी ९ पंचायत समित्यांत काँग्रेस तर ३ पंचायत समित्यांचे सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेले असून एका ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसेनेचा सभापती झाला आहे.
पक्षनिहाय पंचायत समित्यांचे सभापती असेः
काँग्रेसः सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी, कामठी, मौदा, कुही, उमरेड, भिवापूर, नागपूर
राष्ट्रवादी काँग्रेसः कोटोल, नरखेड आणि हिंगणा.
बाळासाहेबांची शिवसेनाः रामटेक.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर जिल्ह्याच्या राजकारणाची खडानखडा माहिती असूनही त्यांना त्यांच्या कामठी पंचायत समितीचे सभापतिपदही भाजपला राखता आलेले नाही. राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे आणि महाविकास आघाडीच्या हातची सत्ता पुन्हा भाजपकडे खेचून आणण्यात कळीची भूमिका बजावणारे देवेंद्र फडवणीस आणि बावनकुळे यांची ही मोठी नामुष्की मानली जात आहे.
दोन अडीच वर्षानंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंचायत समित्यांच्या सभापतिपदाच्या या निवडणुकीचे निकाल भाजपची अस्वस्था वाढवणारे आणि काँग्रेसचा उत्साह वाढवणारे ठरणार आहेत.