शी जिनपिंग पुन्हा बनले चीनचे सर्वोच्च नेते, माओत्से तुंगनंतर देशाचे सर्वात शक्तिशाली नेते म्हणून उदय!

बीजिंगः शी जिनपिंग यांनी रविवारी चीनचे सर्वोच्च नेते म्हणून रविवारी तिसरा कार्यकाळ मिळवला. याचबरोबर शी जिनपिंग हे माओत्से तुंग यांच्यानंतर देशातील सर्वात शक्तिशाली नेते म्हणून उदयास आले आहेत. तिसरा कार्यकाळ मिळाल्यानंतर जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पार्टीतील आपल्या काही नजीकच्या सहकाऱ्यांना पदोन्नतीही दिली. गेल्या काही दिवसांपासून जिनपिंग यांच्याबाबत जागतिक माध्यमात अनेक खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या. एकदा तर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची खोटी बातमीही आली होती.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीने रविवारी शी जिनपिंग यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी पक्षाच्या महासचिवपदी निवड केली. या निवडीनंतर जिनपिंग यांनी माध्यमांशी संवाद साधला. जगाला चीनची गरज आहे. जगाशिवाय चीन विकसित होऊ शकत नाही आणि जगालाही चीनची गरज आहे. सुधारणा आणि खुलेपणाच्या दिशेने ४० वर्षांहून अधिक काळ केलेल्या अथक प्रयत्नांनंतर आम्ही दोन चमत्कार केले आहेत. ते म्हणजे वेगाने आर्थिक विकास आणि दीर्घकालीन सामाजिक स्वास्थ्य, असे जिनपिंग म्हणाले.

 कम्युनिस्ट पार्टीने शी जिनपिंग यांची केंद्रीय सैन्य आयोगाच्या प्रमुखपदीही नियुक्ती केली आहे. मार्चमध्ये सरकारच्या वार्षिक संसदीय सत्रातच औपचारिकरित्या जिनपिंग यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचा मार्ग मोकळा झाला होता. ६९ वर्षीय शी जिनपिंग आता चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा सूत्रे स्वीकारण्यास तयार आहेत.

 कम्युनिस्ट पार्टीच्या २३०० निवडून आलेल्या पार्टी प्रतिनिधींच्या एक आठवडा चाललेल्या काँग्रेसनंतर जिनपिंग यांची निवड करण्यात आली आहे. या काँग्रेसमध्ये पार्टी प्रतिनिधींनी जिनपिंग यांच्या मूळ स्थितीला पाठींबा दिला आणि व्यापक फेरबदलास मंजुरीही दिली. त्यानंतर जिनपिंग यांच्या अनेक माजी प्रतिस्पर्ध्यांनी पदांचे राजीनामे दिले.

 एक दशकापूर्वी देशाचे सर्वोच्च नेते बनलेले जिनपिंग आता माओत्से तुंग यांच्यानंतर देशाचे सर्वात शक्तिशाली नेते म्हणून उदयास आले आहेत. २०१८ मध्ये त्यांनी चीनी राष्ट्राध्यक्षांच्या दोन कार्यकाळाची मर्यादा संपुष्टात आणली होती. तेव्हाच अनिश्चित काळासाठी चीनवर राज्य करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला होता. जिनपिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात चीनला जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून एका उंचीवर नेऊन ठेवले.

विशाल लष्करी विस्तार आणि आक्रमक जागतिक चलनाच्या रुपानेही त्यांनी चीनची ओळख निर्माण केली. त्यामुळे अमेरिकेचे धाबे दणाणून गेले आणि त्यामुळे अमेरिकेने चीनचा तीव्र विरोध करण्यास सुरूवात केली. कर्जाच्या ओझ्याखाली बुडालेली अर्थव्यवस्था सावरणे आणि अमेरिकेच्या वाढत्या स्पर्धेला तोंड देणे ही मोठी आव्हाने त्यांच्यासमोर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!