मुंबई: येत्या चार-पाच दिवसात मान्सून विदर्भाच्या आणखी काही भागात पोहोचून महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. परंतु बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता नसल्यामुळे येत्या आठवड्यात राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता नाही, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात मान्सूनने आगेकूच केली आहे. येत्या चार-पाच दिवसात मान्सून विदर्भाच्या आणखी काही भागात पोहोचून महाराष्ट्र व्यापेल. मात्र या काळात हवामान अनुकुल नसल्यामुळे कोकण वगळता राज्याच्या इतर भागात पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे.
मान्सूनच्या उत्तरार्धात जास्त पाऊस
प्रशांत महासागरात ऑगस्ट २०२३मध्ये निर्माण झालेली ‘एल निनो’ची स्थिती संपून न्यूट्रल स्थिती निर्माण झाली आहे. जुलैपर्यंत न्यूट्रल स्थिती कायम रहाण्याची ६० टक्के शक्यता असून ऑगस्टमध्ये तेथे ‘ला-निना’ विकसित होण्याची ६५ टक्के शक्यता आहे.
ला निनाच्या स्थितीमुळे मान्सूनच्या उत्तरार्धात देशात जास्त पावसाची शक्यता आहे. हंगामातील एकूण पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.