थंडीच्या कडाक्यातून सुटका नाहीच, राज्यात किमान तापमान आणखी घसरणार; राज्यावर अवकाळी पावसाचेही संकट


मुंबईः महाराष्ट्रात सध्या सुरू असलेली थंडीची लाट या महिन्याच्या अखेरपर्यंतही काम राहणार असून राज्यातील किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात किमान तापमानाचा पारा आणखी खाली घसरणार आहे. तर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात राज्यात अवकाळी पाऊस होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवत आहे. महाराष्ट्रात आलेली ही थंडीची लाट या महिन्याच्या अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात सध्या थंडीचा कडाका कायम आहे. १ फेब्रुवारीनंतर हळूहळू परिस्थिती बदलेल असा अंदाज अंदाज आहे.

विदर्भ, मराठ्यासह उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षाही कमी राहील. उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

पुढील काही दिवस छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), अहमदनगर, पुणे आणि विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान ८ ते १० अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमानात हळूहळू वाढ होताना दिसून येईल. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पुढील पाच दिवसांत काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!