बीडः कुणबी जातप्रमाणपत्र घेऊन जे मराठे ओबीसीत आले आहेत, त्यामुळे नाही म्हटले तरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाच आहे. मराठा समाजाचा कुणबी म्हणून ओबीसीत समावेश झाल्यानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा होणार आहे, अशी भूमिका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मांडली आहे. कुणबी म्हणून ओबीसीत समावेश झाला, आता मनानेही ओबीसी व्हा, असा खोचक सल्लाही पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.
मराठा समाजासासाठी सकारात्मक निर्णय झाला. या निर्णयामुळे मराठा समाजाची एक पिढी ओबीसीमध्ये आली असून त्यांचे ओबीसीत स्वागत आहे. मराठा समाजातील कुणबी म्हणून जी संख्या ओबीसीत समाविष्ट झाली आहे, त्यामुळे ओबीसीत थोडी गर्दी होणार आहेच. त्यामुळे नाही म्हटले तरी हा ओबीसीला धक्का आहेच, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
गोपीनाथ मुंडेंपासून आपली एकच भूमिका आहे की, ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. मात्र कुणबी म्हणून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश झाल्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हा गुंतागुंतीचा होणार आहे, अशी भीतीही पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली आहे. गेल्या दहा वर्षांत कोणाला कुणबी प्रमाणपत्र दिले आहे, यावर श्वेतपत्रिका काढा. त्यामुळे या विषयाला सराकात्मक विराम मिळेल, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
कुणबी जातप्रमाणपत्र घेतल्यामुळे मराठा समाज आता ओबीसीत आला आहे. त्यामुळे त्यांनी आता एक मराठा लाख मराठा न म्हणता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणायला हरकत नाही. कुणबी जातप्रमाणपत्र घेऊन ओबीसीत येणाऱ्यांचे स्वागतच आहे. परंतु त्यांनी मनानेही ओबीसी झाले पाहिजे, तरच त्याचा फायदा आहे, असा चिमटाही पंकजा मुंडे यांनी काढला आहे.
मराठा समाजातील गरीब तरूणांना न्याय मिळावा हे साध्य करण्यात मनोज जरांगे यशस्वी झाले आहेत. त्यांचा विजय दुसऱ्यांना नकारात्मक वाटणार नाही, लोकांच्या मनावर ओरखडा लागणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. कायद्याच्या लढाईकरिता त्यांना शुभेच्छा. तसेच ओबीसींनाही शुभेच्छा. कारण त्यांनाही त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
राज्य सरकारने जी अधिसूचना काढली आहे, या अधिसूचनेला १६ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी आहे. आक्षेप काय येतात आणि कायद्यात काय येतेय हे पहावे लागेल. अधिसूचनेवर आक्षेप नोंदवणे हा ओबीसींचा हक्क आहे, असेही त्या म्हणाल्या.
गेले काही महिने महाराष्ट्र अत्यंत तणावपूर्ण वातावरणातून जात आहे. काही प्रवृत्ती ओबीसी आणि मराठा समाजात वितुष्ट आणू पहात आहेत. अशा प्रवृत्तींना आळा घातला पाहिजे. अशावेळी संयमाची भूमिका घेण्याचा प्रयत्न मी केला. मराठा समाजाला कायद्याने टिकणारे आरक्षण मिळावे अशी माझी वेळोवेळी भूमिका मी मांडली आहे. आजही तिच भूमिका आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.