हिंगोलीत हेमंत पाटलांचा पत्ता कट? जागा भाजपकडे घेण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीसच घालणार केंद्रीय नेतृत्वाला गळ, तिढा कायम!


मुंबईः  हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यात चांगलीच ओढाताण सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील भाजपचे अर्ध्या डझनाहून अधिक इच्छुक उमेदवार आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हिंगोलीत पुन्हा ही जागा हेमंत पाटलांना सोडण्यास विरोध दर्शवला. हिंगोलीची जागा भाजपसाठी सोडवून घ्या, आम्ही ती जिंकून दाखवू, असा विश्वासही भाजप पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांना दिला. हिंगोलीची जागा आपण कशी जिंकू शकतो, हे मी केंद्रीय नेतृत्वाला पटवून देतो. त्यानंतर वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे आश्वासन फडणवीसांनी दिल्याचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे हेमंत पाटलांच्या जागेवर टांगती तलवार आहे.

महायुतीचे घटकपक्ष असलेल्या भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. असे असताना भाजपने महाराष्ट्रातील काही जागांवरील उमेदवार जाहीर करून टाकले आहेत.  महायुतीत वाद असलेल्या जागांमध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील भाजपचे इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि हिंगोलीची जागा भाजपला सोडवून घेण्याची मागणी केली.

मागील तीन महिन्यांपासून हिंगोलीच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची चारवेळा भेट घेतली. भाजपची ही जागा जिंकण्याची तयार असून या जागेवर भाजपच्या विजयाचे गणित त्यांना आम्ही समजावून सांगितले. मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री हिंगोलीत आले होते, तेव्हा दोन हजार बुथप्रमुखांना हिंगोलीत एकत्र केले होते. त्या दिशेने आमची पूर्ण तयारी आहे. ही जागा जिंकण्यासाठी आम्ही तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. ही जागा आम्हालाच म्हणजे भारतीय जनता पक्षालाच मिळेल, याची मला खात्री आहे, असे भाजप आमदार तानाजी मुटकुळे म्हणाले.

२०१९ मध्ये हिंगोलीचे आताचे खासदार हेमंत पाटील आमच्या युतीतून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर भाजपचा शिवसेनेसोबत बेबनाव झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्या काळात आम्ही ही जागा आपण सहजपणे जिंकू शकतो, हे आम्ही हेरले. त्या दिवशी आम्ही सर्व नेते मंडळींनी ठराव केला होता की, येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार झाला पाहिजे, असे आ.मुटकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या अडीच वर्षाच्या काळात आम्ही तयारीला लागलो होता. आज आमची पूर्ण तयारी आहे. एका दिवसात आम्ही पूर्ण प्रचार यंत्रणा उभी करू शकतो. शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख आणि जिल्हा परिषद प्रमुख असे सर्वजण भाजपच्या या निवडणुकीत ताकदीनिशी उतरलो  आहोत, असे आ. तानाजी मुटकुळे म्हणाले.

१९८५ च्या निवडणुकीत तत्कालीन उमेदवार विलास गुंडेवार यांनी भाजपकडून हिंगोली लोकसभेची जागा लढवली होती. त्यावेळी ते केवळ १५ हजार मतांनी पराभूत झाले होते. तेव्हापासून हिंगोलीची जागा भाजपने लढवली पाहिजे, असे भाजपच्या कार्यकर्त्यांचे स्वप्न आहे. हिंगोलीत जिंकण्याची आमची शंभर टक्के क्षमता आहे, असेही मुटकुळे म्हणाले. आपणाला हिंगोलीची जागा कशी जिंकता येऊ शकते, हे केंद्रीय नेतृत्वाला पटवून देऊ. त्यानंतर वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे आ. मुटकुळे म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!