बारामतीः ‘आपण औषध विकत घेतो त्याला एक्स्पायरी डेट असते. तशीच नात्यांचीही एक्स्पायरी डेट असते,’ असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सख्खे मोठेबंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे ऐननिवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
अजित पवार यांनी जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून भाजप-एकनाथ शिंदेंच्या शिवसेना सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले. या फुटीमुळे लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा नंणद-भावजयीचा संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.
अशातच अजित पवारांचे सख्खे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनीच काकांनी काहीही दिले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. आत्तापर्यंत अजित पवारांचे ऐकले. आता मात्र हा निर्णय पटलेला नाही. प्रत्येक नात्याला एक एक्स्पायरी डेट असते, असे म्हणत अजित पवारांविरुद्ध शड्डू ठोकत त्यांची साथ सोडली आहे. श्रीनिवास पवार यांनी काटेवाडीत गावकऱ्यांसमोर बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
मी दादांच्या विरोधात कसा?
तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी दादांच्या विरोधात कसा? मी नेहमीच त्याला साथ दिली. चांगला काळ असू दे, वाईट काळ असू, नेहमी दादांच्या बरोबर राहिलो. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी उडी मारली. दादांची आणि माझी चर्चा झाली तेव्हा मी त्याला सांगितले की तू आमदारकीला आहे तर खासदारकी साहेबांना (शरद पवार) दिली पाहिजे. कारण आमच्यावर त्यांचे उपकार आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे, असे श्रीनिवास पवार म्हणाले.
जमीन नावावर केली म्हणून…
जमीन आपल्या नावार केली म्हणून आई-वडिलांना कुणी घराबाहेर काढते का? यांना जी काही पदे मिळाली ती शरद पवारांमुळेच. आता त्यांना म्हणायचे की घरी बसा, किर्तन करा. हे काही मला पटले नाही. मी वेगळा माणूस आहे. आपण औषध विकत घेतो. त्याला एक्स्पायरी डेट असते, तशीच नात्यांचीही एक्स्पायरी डेट असते. आपण वाईट वाटून घ्यायचे नाही. मला दबून जगायचे नाही. जगायचे तर स्वाभिमानाने. जे लाभार्थी आहेत, त्यांच्या मागे जायचे नाही, असे श्रीनिवास पवार म्हणाले.
…तेव्हा मला आश्चर्य वाटले
साहेबांनी काय केलं हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा मला आश्चर्य वाटले. ज्यांनी आपल्याला चारवेळा उपमुख्यमंत्री केले, २५ वर्षे मंत्री केलं अशा काकांना आपण हे विचारतोय? मला जर असा काका मिळाला असता तर मी खुश झालो असतो. ही सगळी भाजपची चाल आहे. भाजपला शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवायचे होते. घरातला व्यक्ती बाहेर पडला तर आपण घर फोडू शकतो, याच नितीने भाजप वागली आहे, असेही श्रीनिवास पवार म्हणाले.
साहेब दहा वर्षे जुने असते तर…
शरद पवारांना एकुलती एक मुलगी आहे. साहेब आज दहा वर्षे जुने असते तर त्यांनी काय केले असते हे सगळ्यांना माहीत आहे. वय वाढले म्हणून त्यांना कमकुवत समजू नका. वीस-पंचवीस वर्षे साहेबांनी राज्य सोपवले होते आणि ते दिल्लीत होते. मी माझा कारखाना माझ्या मुलाकडे सोपवला आहे. वीस वर्षांनी जर मी तिकडे गेलो तर वॉचमनच मला सोडत नाही. आपण खेडेगावातील माणसं आहोत. आपण मरेपर्यंत आई-वडिलांना सांभाळतो, त्यांचे औषधपाणी करतो, असेही श्रीनिवास पवार म्हणाले.
याच्यासारखा नायालक माणूस नाही
माझे मित्र देखील मला म्हणाले की इथून पुढे दादांची वर्ष आहेत. साहेबांचे काही नाही. हा विचारच मला वेदना देऊन गेला. वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही. कारण आपल्याला पुढची दहा वर्षे दुसऱ्याकडून लाभ मिळणार आहे. याच्यासारखा (अजित पवार) नायालयक माणूस नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे. वय वाढले म्हणून वयस्कर माणसाला कमजोर समजू नका, असा इशाराही श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना दिला आहे.
कोण आहेत श्रीनिवास पवार?
श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्खे मोठे बंधू आहेत. ते उद्योजक अजून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांचा व्यवसाय आहे. श्रीनिवास पवार हे राजकारणात सक्रीय नाहीत. मात्र कौटुंबिक कार्यक्रमात ते कायम सक्रीय दिसतात. आयुष्यातील प्रत्येक महत्वाचा निर्णय अजित पवार हे श्रीनिवास पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतात, असे कायम सांगितले जाते. पण आता त्यांनीच अजित पवारांची साथ सोडली आहे.