मुंबईः लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. परंतु आघाडीची जागावाटपाची बोलणी पूर्ण झाली असून उद्धव ठाकरेंची शिवसेना २२, काँग्रेस १६ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागा लढणार असल्याचा संभाव्य फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. आघाडीच्या या जागावाटपात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला चार ते पाच जागा सोडण्याचेही निश्चित झाले असून त्यात अकोला, नांदेड, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), हिंगोली आणि अमरावतीचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपने महाराष्ट्रातील २० जागांची यादी जाहीर करून टाकली आहे. महायुतीचे जागावाटप निश्चित होण्याआधीच ही यादी जाहीर केल्यामुळे भाजपवर टिकाही करण्यात आली. महायुतीतील २८ जागांच्या वाटपावर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीतील जागावाटपाचे सूत्रही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वाधिक २२ जागा लढवणार आहे. काँग्रेस १६ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला १० जागा सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विदर्भातील रामटेकच्या जागेवर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने दावा केल्यामुळे वाद झाला होता. ही जागा ठाकरेंनी काँग्रेसला सोडली असून त्याबदल्यात सांगलीची जागा घेतली आहे. सांगलीत पहेलवान चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असतील. भिवंडीची जागा काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडीने राजू शेट्टींना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. शिवसेनेच्या कोट्यातून ही जागा दिली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी गेमचेंजर ठरणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष त्यांच्या कोट्यातील जागा वंचित बहुजन आघाडीला सोडणार आहेत. तसा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आला आहे. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला चार ते पाच जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्यात नांदेड, अकोला, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीच्या जागेचा समावेश अल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोण लढवणार कोणती जागा?
शिवसेनाः रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, शिर्डी, जळगाव, मावळ, धाराशिव (उस्मानाबाद), परभणी, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) (वंचितला सोडणार), बुलढाणा, हिंगोली (वंचितला सोडणार), यवतमाळ-वाशिम, हालकणंगले (राजू शेट्टींना पाठिंबा), सांगली, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर मुंबई, ईशान्य मुंबई.
काँग्रेसः नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली रामटेक, अमरावती, अकोला (वंचितला सोडणार), लातूर, नांदेड (वंचितला सोडणार), जालना, धुळे, नंदूरबार, पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि उत्तर-मध्य मुंबई.
राष्ट्रवादी काँग्रेसः बारामती, शिरूर, बीड, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, माढा, सातारा, वर्धा, भिवंडी.