मुंबईः पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात आज वादळीवाऱ्यासह मुसळधार पूर्वमोसमी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने संपूर्ण राज्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पाऊस कायम राहील, अशी शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश शहरांतील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे. कमाल तापमानातही वेगाने घट होत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. अशातच आज राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
नैऋत्य मोसमी वारे गोव्याच्या किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. मोसमी पाऊस अरबी समुद्राच्या मध्यभागी सक्रीय झाला आहे. तळ कोकणातील बहुतांश ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आज संपूर्ण महाराष्ट्रात वादळीवाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवस राज्यात पाऊस कायम राहील, असाही हवामान विभागाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्याताली जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद) आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली आणि सोलापुरात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम व यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई उपनगर, पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे.