ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

पुणेः औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाचे कुलगुरू आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. दीनानाथ रुग्णालयात दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

डॉ. कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देलगूर येथे झाले. बी.ए. आणि एम. ए. या दोन्ही पदव्या त्यांनी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केल्या होत्या. त्यांनी कुलपतींचे सुवर्णपदकही पटकावले होते.

 १९७१ ते १९७७ या काळात ते बीड येथील महाविद्यालयात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून काम केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी १९७७ ते १९९६ या काळात प्रपाठक म्हणून काम केले. अध्यापन सुरू असतानाच १९८० मध्ये त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली.  १९९६ ते २००५ या काळात ते पुणे विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख राहिले. त्यानंतर २००५ मध्ये त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली.

साठोत्तरी कालखंडात कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाड्मय प्रकारात डॉ. कोत्तापल्ले यांनी दर्जेदार साहित्य निर्मिती करून योगदान दिले आहे. २०१२ मध्ये चिपळूण येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही डॉ. कोत्तापल्ले यांनी भूषवले आहे.

 कोत्तापल्ले यांची साहित्यसंपदाः कविता संग्रहः मूड्स. कथा संग्रहः कर्फ्यू आणि इतर कथा. दीर्घकथा संग्रहः राजधानी, वारसा, सावित्रीचा निर्णय. कादंबरीः मध्यरात्र, गांधारीचे डोळे, पराभव. समीक्षाः पापुद्रे, ग्रामीण साहित्य-स्वरुप आणि बोध, नवकथाकार शंकर पाटील, साहित्याचा अन्वयार्थ, मराठी कविता- एक दृष्टिक्षेप, साहित्याचा अवकाश. लघु कादंबरीः गावात फुले चांदणे, ललित गद्यः मराठी साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक संघर्ष, उद्याच्या सुंदर दिवसासाठी. अनुवादः जोतीपर्व, संपादित ग्रंथः स्त्री-पुरूष तुलना, शेतकऱ्यांचा आसूड, पाचोळा आणि दहा समीक्षा, निवडक बी. रघुनाथ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!