माहूरः मराठा आरक्षणप्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे घेतलेल्या सभेमुळे मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये राडा झाला. जरांगे पाटील यांची सभा संपल्यानंतर ओबीसी आंदोलकांनी सभास्थळी गोमूत्र शिंपडले. त्याला उत्तर म्हणून मराठा आंदोलकांनी सभास्थळी दुग्धाभिषेक करत घोषणाबाजी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी सध्या माहूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मनोज जरांगे पाटील हे राज्यभर दौरा करून सभा घेत आहेत. जरांगे पाटील यांच्या याच राज्यव्यापी दौऱ्यात नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या आगोदर ओबीसी आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सतर्कता बाळगत काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे माहूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. सभा संपल्यानंतर ओबीसी कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांची सभा संपल्यानंतर पोलिसांनी सोडून दिलेले कार्यकर्ते थेट सभास्थळी दाखल झाले. त्यांनी सभास्थळी येऊन गोमूत्र शिंपडले. या कार्यकर्त्यांनी सभास्थळी जोरदार घोषणाबाजीही केली.
ओबीसी कार्यकर्त्यांनी सभास्थळी गोमूत्र शिंपडल्याचे कळल्यानंतर मराठा आंदोलकांनी सभास्थळी धाव घेतली आणि तेथे दुग्धाभिषेक केला. मराठा आंदोलकांनीही सभास्थळी जोरदार घोषणाबाजी केली.
मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलकांनी केलेल्या या राड्यामुळे माहूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला. सध्या माहूरमध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचे सूत्रांनी सांगितले.