मुंबईः खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघाताने झालेला १४ जणांचा मृत्यू आणि राज्यातील वाढते तापमान यामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण असतानाच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी चिंताक्रांत पालकांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या राज्य मंडळाच्या शाळांना आजपासून (२१ एप्रिल) सुटी देण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील तापमान सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात शाळा भरवण्यात याव्यात, अशी मागणी पालकवर्गातून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी ही घोषणा केली. ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता गृहीत धरून शुक्रवारपासून मुलांना सुटी जाहीर करण्यात येत आहे. ज्या शाळांचा अभ्यासक्रम अद्याप सुरू आहे, त्या शाळा वगळता बोर्डाच्या सर्व शाळांना सुटी असेल. विदर्भ वगळता महाराष्ट्रातील शाळा १५ जूनपासून सुरू होतील. तर विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू होतील, असे केसरकर म्हणाले.
सुटीच्या काळात काही शाळांमार्फत अतिरिक्त वर्ग किंवा अन्य उपक्रम राबवण्यात येतात. ते सकाळच्या किंवा संध्याकाळच्या सत्रात घेण्यात यावेत. दुपारच्या सत्रात असे उपक्रम घेता येणार नाहीत. नववी आणि दहावीचे वर्ग वगळता कोणत्याही वर्गाच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलावण्यात येऊ नये. कारण उष्णतेच्या लाटेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मुलांवर सुटीच्या काळात अभ्यासाचा बोजा देऊ नये, असेही केसरकर म्हणाले.
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी हा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. केवळ केंद्रीय मंडळाच्या शाळांत यंदाच्या बॅचला आठवीच्या वर्गाला गुणांकनाची सवलत देण्यात आली आहे. मराठी हा विषय वगळण्यात आलेला नाही, असा खुलासाही केसरकर यांनी केला आहे.