औरंगाबादः परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील दहेगाव व पेंढापूर येथील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. काहीही झाले तरी धीर सोडू नका, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा आहे. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.
जे सुरू आहे ते सर्व दुर्दैवी आहे. पण तुम्ही काळजी करू नका, धीर सोडू नका. मी तुमच्या सोबत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. संकटे येत असतात. त्या संकटांना सामोरे जायचे आहे. काहीही झालं तरी तुम्ही धीर सोडू नका. आता रडायचे नाही, लढायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था ठप्प असताना शेतकरी जर उभा राहिला नसता तर आपल्या राज्याचे अर्थचक्र फिरले नसते. शेतीने त्यावेळी आपल्या अर्थव्यवस्थेला सांभाळले. आता शेतकरी अडचणीत आहे. त्याला आधार मिळाला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला मदत देण्यासाठी सरकारला कसेही करून भाग पाडू, असे ठाकरे म्हणाले.
सध्या आपण अतिशय विचित्र अवस्थेत आहोत. एका बाजूला दिवाळी सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे दिवाळं निघाले आहे. दिवाळी साजरी करणे तर दूरच पण घरात अन्न काय शिजवायचे असा प्रश्न आपल्या अन्नदात्याला पडला आहे. पण सरकारचे या परिस्थितीकडे लक्ष नाही. आपल्या उपमुख्यमंत्र्यांकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे असतात. नुकतेच पुण्यात जास्त पाऊस झाल्यावर ते म्हणाले की पाऊस किती पडावा हे महापालिकेच्या हातात नसते. आताही राज्यभर अतिवृष्टी झाल्यानंतर ते म्हणू शकतात की हा पाऊस सरकारच्या हातात नसतो, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्त्र सोडले.
शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथाः पावासमुळे हातात काहीच उरले नाही. मोठा खर्च करून आम्ही पिके आणली. पण सर्वच्या सर्व पिके पाण्याखाली गेली. आता आम्ही दिवाळी तरी कशी साजरी करायची? अशा शब्दांत शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. या व्यथा मांडताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यावर तुम्ही धीर सोडू नका, असा दिलासा ठाकरे यांनी दिला. तुमच्याकडे असलेला आसूड फक्त हातात घेऊ नका, त्याचा योग्यवेळी वापरही करा, असे आवाहनही ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले. हा आसूड सरकारविरोधात वापरा, असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी दिला. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आदी त्यांच्यासोबत होते.