विद्यापीठ विकास मंचचे डॉ. व्यंकट लांब आणि डॉ. अपर्णा पाटील व्यवस्थापन परिषदेवर, राष्ट्रवादीच्या उत्कर्ष पॅनलची पिछेहाट


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत झालेल्या निवडणुकीत डॉ.व्यंकट लांब, डॉ.अपर्णा पाटील हे व्यवस्थापन परिषदेवर निवडून आले आहेत. या निवडणूक प्रक्रियेत  विद्या परिषदेच्या ५५ सदस्यांनी सहभाग घेतला तर पाच सदस्य गैरहजर राहिले. विशेष म्हणजे विजयी झालेले हे दोन्ही उमेदवार भाजप- अभाविप प्रणित विद्यापीठ विकास मंचचे आहेत.

या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचे डॉ.व्यंकट बजरंग लांब यांना ३५ मते मिळाली तर विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचे उमेदवार डॉ. राजेश भाऊसाहेब लहाने यांना २० मते मिळाली. डॉ. लांब हे १५ मते जास्तीची घेऊन विजयी झाले.

विद्यापीठ विकास मंचच्याच आणखी एक उमेदवार डॉ. अपर्णा हिंमतराव पाटील यांना ३७ मते मिळाली. तर त्यांच्या नजीकच्या प्रतिस्पर्धी व विद्यापीठ उत्कर्ष पॅनलच्या उमेदवार डॉ.रेखा मोहन गुळवे यांना १८ मते मिळाली. डॉ. पाटील या १९ मते जास्तीची घेऊन विजयी झाल्या.

व्यवस्थापन परिषदेवर निवडून गेलेले डॉ. व्यंकट लांब हे सिल्लोडच्या इंद्रराज महाविद्यालयात इतिहास विभागाचे अध्यापक म्हणून २० वर्षापासून कार्यरत आहेत. तर डॉ. अपर्णा पाटील या पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयात दोन दशकांपासून हिंदी विभागात अध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

विद्या परिषदेवर डॉ.सर्जेराव जिगे हे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तर डॉ.अपर्णा पाटील या हिंदी अभ्यास मंडळाच्या सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत. आता त्या व्यवस्थापन परिषदेसाठी विजय झाल्या आहेत. डॉ.जिगे व डॉ.अर्पणा पाटील हे दांपत्य पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयात कार्यरत असून दोघेही पहिल्यादांच विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर निवडून आले आहेत.

विद्या परिषदेतून व्यवस्थापन परिषदेवर पाठवावयाच्या दोन सदस्यांच्या निवडीसाठी विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात शनिवारी विद्या परिषदेची बैठक घेण्यात आली.  दुपारी १२ ते एक या दरम्यान मतदान, मतमोजणी प्रक्रिया राबवण्यात आली. बैठकीस ६० पैकी ५५ सदस्य उपस्थित होते व त्या सर्वांनी मतदानात सहभाग घेतला.

विशेष म्हणजे या निवडणुकीत कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी सर्वांत अगोदर तर कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी सर्वात शेवटी मतदान केले. महात्मा फुले सभागृहात मतदान घेतल्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात मतमोजणी करण्यात आली. कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी निकाल घोषित केला.

या निवडणूक प्रक्रियेसाठी कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांच्यासह डॉ.आय.आर. मंझा, डॉ.संजय कवडे, दिलीप भरड, डॉ.विष्णु कऱ्हाळे, भरत वाघ, संजय लांब आदींनी प्रयत्न केले. दरम्यान, या बैठकीत एकूण ५२ विषय मांडण्यात आले. ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!