जुने फोटो अपलोड करून ई-चलन वसुलीचे धंदे बंद करा, आवश्यक तेथेच कारवाई कराः परिवहन मंत्र्यांचे वाहतूक पोलिसांना निर्देश


मुंबई: वाहनांना ई-चलन फाडून दंड आकारणी करताना जुने फोटो अपलोड करून ई-चलल वसुलीचे प्रकार बंद करा. वाहनांचे रिअल टाइम फोटोच अपलोड करा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील वाहतूक पोलिसांना दिले आहेत. वाहतूक व्यावसायिकांच्या ई-चलन विषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी समिती स्थापन करून या समितीने एक महिन्याच्या आत समितीने अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

मंत्रालयात ई-चलन प्रक्रिया सुधारणासंदर्भात गुरूवारी आयोजित बैठकीत सरनाईक यांनी संबंधितांना मार्गदर्शन केले. बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, यांच्यासह अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) गृह विभाग संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, विविध वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ई-चलन प्रणालीत सुधारणा करताना प्राधान्याने वाहनचालक व  मालक यांना नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन देणारे निकष असावे, त्यात कुठेही जाचक अटी लादू नये. एकाच दिवसात एका कारणासाठी वेगवेगळी चलन वसूल करु नये. त्यासाठी चलनाचा ग्राह्यता कालावधी निश्चित करावा, व्यावसायिक वाहनांना पार्किंग सुविधा उपलब्ध करुन द्यावी, मुंबईमध्ये जड वाहतूक वाहनांना प्राधान्याने पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. वाहतूक संघटनांच्या समस्या सोडवण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांची सयुंक्त समिती गठीत करावी, त्यामध्ये वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग घ्यावा.  जेणेकरुन समितीच्या कामात पारदर्शकता व सर्वसमावेशकता येईल, असे निर्देशही त्यांनी दिले.

पोलिस विभागमार्फत करण्यात येणाऱ्या कारवाईत सध्याच्या ई-चलन निकषात शिथिलता आणावी. परिवहन विभागाच्या परित्रकाच्या निकषानुसार पोलिसांनी देखील आवश्यक तिथेच कार्यवाही करावी. चलन लावताना लाईव्ह फोटो अपलोड करावे, रिअल टाइम फोटो घ्यावेत. अनावश्यक कारवाई करणे थांबवावे. संपूर्ण चलन प्रक्रिया ही सहिष्णू, पारदर्शक आणि सुव्यवस्थितरित्या राबवण्याच्या दृष्टीने समितीने अभ्यास करावा, अशी सूचना सरनाईक यांनी केली.

ई-चलनाचे जे निकष जाचक ठरणारे असतील त्यात सुयोग्य बदल करण्यात यावे. वाहनांसाठीची गती मर्यादा, पार्किंग नियमावली यासर्वांचा अभ्यास करुन समितीने अहवाल द्यावा. वाहतूक संघटनांच्या मागण्यांना न्याय देण्याची विभागाची भूमिका असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.  

चलन प्रक्रियेतील जाचक अटी नियमांत बदलण करणे  आवश्यक असून  पार्किंग माफीयाच्या वाढत्या समस्येबाबत गांर्भियाने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात. वाहतूक पोलिसांनी जुने फोटो अपलोड करुन चलन वसूली करण्याचे प्रकार तत्काळ थांबवावेत, असे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले. मुख्यमंत्री रोजगार योजनेत वाहतूक व्यवसायाला समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही सामंत यांनी आश्वासित केले.  बैठकीत वाहतूक संघटानांच्या प्रतिनिधींनी आपल्या  मागण्या व समस्या मांडल्या.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!