नांदेडच्या सरकारी रुग्णालयात आणखी ७ रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा ३१ वर; आणखी ६६ रुग्ण अत्यवस्थ


नांदेड/छत्रपती संभाजीनगरः अपुरे मनुष्यबळ आणि औषधांचा तुटवडा यामुळे नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभर खळबळ उडाली असतानाच याच रुग्णालयात आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नांदेडमध्ये ४८ तासांत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. दरम्यान, नांदेडच्या रुग्णालयात मृत्यूचे थैमान सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) घाटी रुग्णालयातही १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात सोमवारी २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मृतांमध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश असल्याचे समोर आल्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. सोमवारनंतर मंगळवारी रात्रीपासून सकाळपर्यंत याच रुग्णालयात आणखी ७ रुग्ण दगावल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी दिली. यामुळे नांदेडच्या रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा ३१ वर पोहोचला आहे.

अपुरे मनुष्यबळ आणि औषधांच्या तुटवड्यामुळे नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने हा आरोप फेटाळून लावला आहे. गंभीर आजार असणारे रुग्ण दाखल झाले. त्यांच्यावर पूर्ण उपचार केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले असतानाच याच रुग्णालयात आणखी ७ रुग्ण दगावल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखीच वाढले आहे. मृतांमध्ये ४ नवजात बालकांचा समावेश आहे.

‘नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान चालूच. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी’,  असे ट्विट करत अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

३८ बालकांसह आणखी ६६ रुग्ण अत्यवस्थ

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात सध्या १३८ नवजात बालकांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३८ नवजात बालकांची प्रकृती अत्यवस्थ आहे. अन्य २५ रुग्णांची प्रकृतीही गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. या ६६ अत्यवस्थ रुग्णांना वाचवण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांनी सांगितले. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दररोज सरासरी १६ रुग्ण दगावत असतात, असेही वाकोडे म्हणाले.

गंभीर अवस्थेतील रुग्ण वाचवाः अशोक चव्हाण

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय अधिष्ठात्यांनी आमच्या लोकांना दिली. झाले ते गंभीरच आहे. पण आता गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना वाचवायला हवे. शासनाकडून त्यांना आवश्यक त्या गोष्टी उपलब्ध करून द्यायला हव्यात. पण शासकीय पातळीवर ही इच्छाच दिसत नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.

ट्रिपल इंजिनचे सरकार खूनीःखा. सुळे

नांदेडमधील घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. राज्यातील ट्रिपल इंजिनचे सरकार खूनी आहे. तीन महिन्यांत कुठली चांगली कामे झाली आहेत? या बळींना पूर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. संबंधित विभागाच्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

चौकशी समिती आज नांदेडात

दरम्यान, नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती स्थापन केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील डॉ. भारत चव्हाण, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. जोशी या तिघांची समिती नांदेड आज (मंगळवारी) चौकशी करणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!