सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाला पाच महिन्यांनंतर मिळाले कुलगुरू, डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती


मुंबई:  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी केलेल्या या नियुक्तीमुळे तब्बल पाच महिन्यांनंतर सोलापूर विद्यापीठाला कुलगुरू मिळाला आहे.

 १ जून १९६७ रोजी जन्मलेले डॉ. प्रकाश महानवर सध्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर कार्यरत आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा कार्यकाळ ५ मे २०२३ रोजी संपल्यामुळे सदर पद रिक्त झाले होते. त्यानंतर डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांदे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती.

विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रमोद पडोळे, हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. सुरेशकुमार (यूजीसी प्रतिनिधी) व राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  विकास चंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य होते.

समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी यांनी डॉ. प्रकाश महानवर यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!