१२ निष्पापांचे बळी गेल्यानंतर राज्य सरकारला उपरती, उन्हाबाबत आता घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय


मुंबईः नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात १२ निष्पाप लोकांचे उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे बळी गेल्यानतंर राज्य सरकारला उपरती झाली असून आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दुपारच्या वेळी खुल्या मैदानात कोणताही कार्यक्रम घेऊ नये, असे निर्देश आता राज्य सरकारने काढले आहेत.

खारघरमध्ये भरदुपारी कार्यक्रम घेतल्यामुळे या कार्यक्रमासाठी जमलेल्या लाखो लोकांपैकी अनेकांना उष्माघाताचा फटका बसला. त्यात १२ जणांचा बळी गेला. कार्यक्रमाची वेळ निवडण्यात आयोजकांनी आणि सरकारने चूक केली, असा ठपका ठेवला जात आहे. याप्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

भरदुपारी उन्हात मोकळ्या मैदानात कार्यक्रम घेतल्यमुळे ओढवलेल्या या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या निर्णयाबाबतची माहिती दिली.

भरदुपारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्यावेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश राज्य सरकारने काढले आहेत. जोपर्यंत राज्याची उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारच्या वेळी असे कार्यक्रम आयोजित करू नये, असे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.

खारघरची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची कल्पना कुणी केली नव्हती. त्यादिवशी जे काही झाले, त्याची पुनरावृत्ती कुठेही होऊ नये, कुणाला त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारी १२ ते ५ यावेळेत खुल्या भागात, मैदानात कोणताही कार्यक्रम घ्यायचा नाही, असा निर्णय घेतला आहे. लोकांनी याचे पालन करायला हवे, असे लोढा म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!