मुंबईः लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या ८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. रामटेकवगळता इतर सात लोकसभा मतदारसंघात सात विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरमधून संजय मंडलिक आणि हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित मानली जात नसताना त्यांचा पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या आठ उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे ठाणे आणि कल्याण हा मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र पहिल्या यादीत या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघाचाही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.
कल्याण आणि ठाणे हा मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला मानला जात असला तरी या दोन्ही मतदारसंघांसाठी भाजप आग्रही आहे. या दोन मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. असे असले तरी कल्याणमधून मुख्यमंत्री शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे सांगितले जाते.
महायुतीतील भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यातील चर्चेमधून ज्या जागांचा तिढा सुटलेला आहे, अशा आठ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहेत. ते उमेदवार असेः
- मावळः श्रीरंग बारणे
- हिंगोलीः हेमंत पाटील
- हातकणंगलेः धैर्यशील माने
- कोल्हापूरः संजय मंडलिक
- बुलढाणाः प्रतापराव जाधव
- रामटेकः राजू पारवे
- शिर्डीः सदाशिव लोखंडे
- मुंबई दक्षिण मध्यः राहुल शेवाळे
रामटेकमध्ये कृपाल तुमानेचे तिकिट कापले
शिवसेनेच्या फुटीनंतर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात असले तरी जिल्ह्यातील शिवसैनिक मात्र ठाकरे गटासोबतच तुमाने यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. कृपाल तुमाने हे या मतदारसंघातून दोनवेळा विजयी झाले आहेत. तरीही यावेळी त्यांचे तिकिट कापण्यात आले आहे. त्यांच्या जागी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले उमरेडचे आमदार राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामटेक हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.
नाशिकमध्ये गोडसेंच्या नावाचाही उल्लेख नाही
काही दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलेल्या पहिल्या यादीत नाशिकच्या उमेदवाराचा समावेश नाही. यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या उमेदवाराचेही नाव घोषित करण्यात आलेले नाही. भावना गवळी या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार असून त्या शिंदे गटात आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात असून हे मतदारसंघ भाजप किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात गेलेत की काय? अशी शंका घेतली जाऊ लागली आहे.