उर्ध्व पैनगंगा प्रकल्पामधील सिंचनतूट भरून काढण्यासाठी पाणीसाठा निर्माण करणारः उपमुख्यमंत्री


मुंबई: उर्ध्व पैनगंगा हा मोठा जलसिंचन प्रकल्प असून यामध्ये अपेक्षित पाणीसाठा क्षमता उपलब्ध  होत नाही. त्यामुळे या प्रकल्पाची यशस्वीता वाढविण्यासाठी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये उच्च पातळी श्रुंखला प्रस्तावित करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील सिंचनातील तुट भरुन काढण्यासाठी पाणीसाठा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार आणि सदस्य सर्वश्री अशोक चव्हाण, राजेश पवार, मोहनराव हंबर्डे, संजय गायकवाड यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला सोमवारी उत्तर देताना फडणवीस बोलत होते.

राज्यपाल यांनी हिंगोली जिल्ह्याच्या सिंचनाचा अनुशेष घोषित केला आहे. या अनुशेषांची पूर्तता करण्यासाठी १४ योजनांना मान्यता दिलेली आहे. या १४ योजनांमध्ये जांभरुन बृहत लघू पाटबंधारे योजनेचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष दूर करण्यासाठी खरबी बंधाऱ्याचा पाणी वापर १७.६२ दशलक्ष घनमीटरने कमी करुन जांभरुन बृहत लघु पाटबंधाऱ्यासाठी पाणी उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे फडणवीस म्हणाले.

हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष भरुन काढताना दुसऱ्या जिल्ह्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन उर्ध्व बाजूस कोणताही नवीन प्रकल्प घेतला जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. जेणेकरुन धरणाच्या पाणी वापरात तुट येणार नाही, असेही फडणवीस यांनी लक्षवेधीला उत्तर देताना स्पष्ट केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!