सावधानः औरंगाबादेत आढळले गोवरचे आठ संशयित रूग्ण, महापालिकेकडून सर्वेक्षण सुरू

औरंगाबादः औरंगाबाद शहरात गोवरचे आठ संशयित रूग्ण आढळून आले आङेत. शहरातील शताब्दी नगर, रहेमानिया कॉलनी या भागात हे संशयित रूग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या रक्ताचे नमुने मुंबईतील हाफकीन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद महानगरपालिकेने गोवरचे संशयित रुग्ण आढळून आलेल्या भागात सर्वेक्षण सुरू केले आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

मुंबईसह मालेगाव, भिवंडी या शहरांबरोबरच राज्यातील अन्य भागात गोवरचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे. त्यातच आता औरंगाबादेत गोवरचे आठ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात शताब्दी नगर भागातील सहा आणि रहेमानिया कॉलनी भागातील दोन रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी हाफकिन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब आणि महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी शताब्दी नगर भागाला भेट देऊन या संशयित रुग्णांची पाहणी केली.

संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शताब्दी नगर आणि रहेमानिया कॉलनीत आशा सेविकांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून गोवरच्या रुग्णांची माहिती देण्याबाबत कळवण्यात आले आहे, असे डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

काय आहेत लक्षणे?:  गोवर हा विषाणूपासून पसरणारा एक संसर्गजन्य आजार आहे.सर्दी, ताप, डोळे लाल होणे, अंगावर पुरळ येणे, खोकल्यासारखी लक्षणे असणे आदी लक्षणे गोवरच्या संशयित रुग्णात आढळून येतात. डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यांना प्रकाश सहन न होणे, घशात दुखणे, तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे स्पॉट जाणवणे, अशक्तपणा जाणवणे आणि अंग दुखणे आदी लक्षणे गोवरमध्ये जाणवतात.

सहाव्या महिन्यातच मिळणार गोवर लसीचा डोसः मुंबईसह राज्यात आढळून येणारे गोवरचे रुग्ण हे ९ महिन्यांचे लसपात्र वय होण्याच्या आतील आहे. गोवरमुळे मृतांचा आकडाही वाढत आहे. गोवरची लागण झालेल्यांमध्ये लसीकरण न झालेली बालके सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहा महिन्यांच्या मुलांना गोवरची लस तसेच नऊ महिन्यांवरील मुलांना गोवर लसीची अतिरिक्त मात्रा देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले नुकतेच दिले आहेत.

केंद्र सरकारच्या सूचनाः महाराष्ट्रात गोवर लसीचे रुग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यात संशयित रुग्ण तातडीने शोधा, उद्रेक झालेल्या भागात लसीकरण मोहीम राबवा, ५ ते ६ वर्षांपर्यतच्या बालकांना लसीची अतिरिक्त मात्रा द्या, जिल्हा टास्क फोर्सची स्थापना करा, मुलांच्या सकस आहारावर भर द्या, मुलांना अ जीवनसत्वाच्या गोळ्या द्या, जुलाब, श्वसनाचा त्रास असल्यास बालकांना रुग्णालयात दाखल करा आणि रुग्णावर आठवडाभर विलगीकरणात उपचार करा, या सूचनांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!