देवेंद्र फडणवीसांच्याच खात्याला लाचखोरीचा विळखाः निधी मंजुरीसाठी लाखोंची लाच स्वीकारताना मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक


मुंबईः अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील कारकुनाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडल्याचे प्रकरण ताजे असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या अर्थ व नियोजन खात्यातील बड्या अधिकाऱ्याला तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. एसीबीच्या पथकाने खारघरमध्ये आज केलेल्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील राजेंद्र ढेरंगे या कारकूनला २५ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने १२ फेब्रुवारी रोजी रंगेहाथ पकडले होते. एसीबीने केलेल्या या कारवाईमुळे राज्यात खळबळ उडाली होती. या कारवाईमुळे मंत्री झिरवाळ यांचा राजीनामा घ्या, अशी मागणीही विरोधकांनी लावून धरली होती. या प्रकरणामुळे मंत्रालयातील लाचखोरीचा मुद्दा चर्चेला आला होता. याच मुद्यावर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही चर्चा झाली होती.

मंत्रालयातील लाचखोरीच्या मुद्यावर झालेल्या चर्चेवरून उडालेला धुराळा शांत होतो न होतो तोच एसीबीने आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली आहे.

ग्रामविकास विभागाचा प्रलंबित निधी मंजूर करून देण्यासाठी अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याने लाचेची मागणी केली होती. विलास लाड याने शासकीय कामासाठी अडवणूक करून तब्बल ६ लाख ३७ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) केली होती.

या तक्रारीची दखल घेत एसीबीने आज खारघर परिसरात सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे विलास लाड लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी खारघर परिसरात आला आणि एसीबीने रचलेल्या सापळ्यात अलगद अकडला. त्यामुळे मंत्रालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, लाचेची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या विलास लाडची एसीबीकडून कसून चौकशी सुरू असून त्याच्या संपत्तीचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

मंत्रालयातील कामासाठी लाच घेताना अटक अधिकाऱ्याला अटक होण्याची नजीकच्या काळातील ही दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे अर्थ व नियोजन खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे आपल्याच खात्यावर मुख्यमंत्र्यांचा वचक राहिला नाही का? असा सवालही दबक्या आवाजात केला जाऊ लागला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!