
नवी दिल्लीः नॅशनल टेस्टिंग एजन्सीने डिसेंबर २०२५ च्या सत्रात घेतलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) राष्ट्रीय पात्रता परीक्षेची (NET) सुधारित अंतिम आन्सर की जारी केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या कठोर निर्देशांनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाच विषयांची ही सुधारित अंतिम आन्सर की असून या सुधारित अंतिम आन्सर की मध्ये इतिहासाच्या पेपरमधील पाच तर वाणिज्य विषयाच्या पेपरमधील तीन प्रश्न वगळण्यात आले आहेत.
तात्पुरत्या आन्सर कीवर आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत १४ जानेवारी रोजी या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी इतिहासाच्या पेपरमधील नऊ प्रश्न आणि भाषांतरांमध्ये चुका असल्याचा आक्षेप नोंदवला होता. एनटीएने ४ फेब्रुवारी २०२६ रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर करताना या आक्षेपांवर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही, असा दावा उमेदवारांनी केला होता.
दरम्यान, एनटीएने दिलेल्या चुकीच्या उत्तर पर्यायांमुळे केवळ दोन गुणांनी ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी (JRF) पात्र होण्याची संधी हुकली असा दावा करत कार्तिकेय काहोल नावाच्या एका उमेदवाराने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याला जेआरएफसाठी पात्र ठरवण्यासाठी दोन गुण देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने एनटीएला दिले आणि उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपांची तपासणी करण्यासाठी चार आठवड्यांच्या आत एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देशही एनटीएला उच्च न्यायालयाने दिले.
हा मुद्दा एका उमेदवारापुरता मर्यादित नव्हता. सुमारे ६० हजार ७७७ उमेदवारांनी इतिहास विषयाची नेट परीक्षा दिली होती. कथित विसंगतींमुळे मोठ्या संख्येने उमेदवारांना फटका बसलेला असू शकतो, असेही दिल्ली उच्च न्यायालयाने नमूद केले. आक्षेप नोंदवतांना आम्ही सतीशचंद्र आणि अभिषेक यादव यासारख्या इतिहासकारांच्या ग्रंथांसह प्रमाणित शैक्षणिक स्रोतांचा संदर्भ दिला होता, असे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले. मात्र कोणतेही सविस्तर स्पष्टीकरण न देताच एनटीएने आमचे आक्षेप फेटाळले, असा दावाही केला होता. न्यायालयाच्या निर्देशांनंतर एनटीएने आता सुधारित अंतिम आन्सर की जारी केली आहे.
कशी डाऊनलोड करायची सुधारित अंतिम आन्सर की?
- www.ugcnet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- या अधिकृत संकेतस्थळाच्या होमपेजवर ‘Public Notices’ सेक्शनमध्ये ‘Final Answer Key For UGC NET December 2025’ वर क्लिक करा.
- क्लिक केल्यावर सुधारित अंतिम आन्सर की डाऊनलोड होईल.
भविष्यातील संदर्भासाठी ही सुधारित अंतिम आन्सर की सेव्ह करून ठेवा. एनटीएने सुधारित अंतिम आन्सर की जारी केल्यामुळे इतिहास, अर्थशास्त्र, शिक्षा, कॉमर्स आणि हिंदी या विषयांच्या निकालांचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. हे निकाल आता कधीही जाहीर केले जाऊ शकतात.
