मारकडवाडीतील बॅलेट पेपरवरील मतदानाचा निर्णय मागे, प्रशासनाच्या दबावानंतर गावकऱ्यांची माघार;  आ. जानकरांची घोषणा


सोलापूरः  लाठ्या मारा किंवा गोळ्या घालत असे म्हणत प्रशासनाचा विरोध झुगारून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी या गावात आज बॅलेट पेपरवर मतदान घेणारच या भूमिकेवर ठाम असलेल्या गावकऱ्यांनी अखेर हा निर्णय मागे घेतला. प्रशासनाच्या दबावानंतर बॅलेट पेपरवरील मतदानाची प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय महाविकास आघाडीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी जाहीर केला. पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर गावकऱ्यांशी चर्चा करून आ. जानकरांनी माध्यमांसमोर हा निर्णय सांगितला.

पोलिस प्रशासनासोबत सुरूवातीला चर्चा केली. एकही मतदान केले तर तुमचे सगळे साहित्य, मतपत्रिका किंवा मतपेट्या सगळे आम्ही गुंडाळून घेऊन जाऊ, तुमच्या सर्वांवर गुन्हे दाखल करू. आधीच आम्ही कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू केली आहे, असे पोलिसांनी सांगितल्याचे आ. उत्तमराव जानकर म्हणाले.

प्रशासनाने मांडलेल्या भूमिकेवर गावकऱ्यांशी चर्चा केली. जर मतदानच करू देणार नसतील आणि आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते हिसकावणार असतील तर यात गोंधळ उडेल, झटापट होईल आणि लोक निघून जातील. मतदानाच्या प्रक्रियेत किमान १५०० मतदान झाल्याशिवाय निकाल येऊ शकत नाही. ते १५०० मतदान मला होणार होते, पण प्रशासनाच्या भूमिकेमुळे मतदानच करू द्यायचे नाही आणि साहित्य घेऊन जायचे हा पोलिसांचा प्लॅन आहे. त्यामुळे ग्रामस्थांशी चर्चा करून आम्ही मतदान थांबवण्याचा निर्णय घेतला, असे जानकर म्हणाले.

ईव्हीएमवरील मतदान प्रक्रियेतील त्रुटींच्या विरोधात आंदोलन छेडणाऱ्या मारकडवाडीतील गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. विशेष म्हणजे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर हे विजयी झालेले आहेत. परंतु त्यांना आमच्या गावात मिळालेली मते कमी आहेत, असा आरोप करत गावकऱ्यांनी हा पवित्रा घेतला होता.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर हे विजयी झालेले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला आहे. परंतु या विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मारकडवाडी गावात हजारोंच्या संख्येने मतदार महाविकास आघाडीचे समर्थक असूनही जानकरांना अपेक्षित मतदान पडले नाही, त्यामुळे गावकरी आक्रमक झाले होते.

जानकरांना अपेक्षित मताधिक्य न मिळाल्यामुळे मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. परंतु सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे आता कोणत्याही प्रकारची निवडणूक प्रक्रिया राबवता येणार नाही, असे जाहीर केले. त्यामुळे ईव्हीएममध्ये गैरप्रकार होत आहेत, ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ३ डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर मतदान घेणारच, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. तशी तयारीही करण्यात आली होती.

गावकऱ्यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहता सोलापूर जिल्हा प्रशासनाने सोमवारपासूनच गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. प्रशासनाने काही गावकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे कोणतेही पाऊल टाळण्यासाठी आम्ही ग्रामस्थांशी बोलून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे सोलापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. प्रशासनाने गावात ५ डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू केली आहे.

काय होता नेमका आक्षेप काय?

मारकडवाडीत दोन हजारहून अधिक पात्र मतदार आहेत. २० नोव्हेंबर रोजी या मतदारांपैकी १९०० मतदारांनी मतदान केले. मारकडवाडी गावाने महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील कुटुंबाला पाठिंबा जाहीर केला होता. मतमोजणी झाली तेव्हा मारकडवाडी गावात उत्तमराव जानकर यांना ८४३ मते मिळाली तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना १००३ मते मिळाली. त्यामुळेच गावकऱ्यांनी ईव्हीएम मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेत मतवाटपाचा पुरावा मिळवण्यासाठी आज बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला होता.

आ. जानकरांचा आरोप काय?

या एकूणच प्रक्रियेबाबत आ. उत्तमराव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला निवडणूक आयोगाला दाखवायचे आहे की ईव्हीएम पद्धतीत घोळ आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला ५४ हजार मते मिळाली होती. माग आता १ लाख ८ हजार मते कशी मिळाली, हा सवाल आहे. एकाच एक पद्धतीने या ठिकाणी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा संशय वाटतो. प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे, असे आ. जानकर म्हणाले होते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!