न्यूजटाऊनचा आज वर्धापनदिनः विश्वासार्हतेच्याही ‘विश्वासार्हते’चा सहा वर्षांचा प्रवास!


  • सुरेश पाटील, मुख्य संपादक

सध्याच्या युगात कोणत्याही तथ्यांची पडताळणी न करताच ‘मोदीने लिया पाकिस्तान से बडा बदला, भारतीय सेना ने किया इस्लामाबाद पर कब्जा’ किंवा ‘मोदी ने रूकवा दी युक्रेन की जंग’ अशा फेकन्यूजच सर्रासपणे ब्रेक्रिंग न्यूज म्हणून थोपवणाऱ्या पत्रकारितेची चलती असतानाच ३१ ऑगस्ट २०१९ रोजी पत्रकारितेच्या ग्लोबल दुनियेत पाऊल ठेवलेल्या न्यूजटाऊनने मात्र प्रारंभापासूनच तथ्यांची पडताळणी केल्याशिवाय कोणतीही बातमी द्यायची नाही, या स्वतःसाठीच ठरवून घेतलेल्या आचारसंहितेचे कटाक्षाने पालन केले आहे.

‘भयमुक्त आणि चाटुगिरीमुक्त पत्रकारिता’ (Journalism Without Fear & Favor!) असे बोधवाक्य उराशी बाळगून उपेक्षित, दुर्लक्षित, आधारवंचित समाजाचे विविध प्रश्न, राजकारण आणि धोरण, सरकार आणि प्रशासन या मुद्यांवर लक्ष केंद्रित करतानाच लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण करत भयमुक्त समाजाची जडणघडण करण्याच्या दिशेने न्यूजटाऊनने सुरू केलेली वाटचाल गेल्या सहा वर्षांत विश्वासार्हतेचीही ‘विश्वासार्हता’ (Credibility of Credibility) सिद्ध करणारी ठरली आहे, हे सांगताना आम्हाला अभिमान वाटतो आहे.

आर्थिक व मनुष्यबळ संसाधने मर्यादित असताना कोणाच्याही लांगुलचालनाला बळी न पडता ध्येय्यनिष्ठेने वाटचाल करत राहणे तसे पाहता म्हणावे तितके सोपे नाही. परंतु न्यूजटाऊनने गेल्या सहा वर्षांच्या वाटचालीत वस्तुनिष्ठता आणि तथ्यांवर आधारित शोधपत्रकारिता हाच आपला धर्म आणि श्वास मानला आहे. त्यामुळे जे मुद्दे आणि प्रश्न प्रस्थापित पत्रकारितेसाठी आजवर अस्पृश्य होते, त्या मुद्यांना न्यूजटाऊनने धाडसाने हात घालून ते तडीस नेण्याचा प्रयत्न केला आहे. आधीचे औरंगाबाद आणि सध्याच्या छत्रपती संभाजीनगरात न्यूजटाऊनचे मुख्यालय असले तरी न्यूजटाऊनने स्थापित केलेल्या विश्वासार्हतेच्याही विश्वासार्हतेमुळे महाराष्ट्रभरातील वाचकांमध्ये न्यूजटाऊन लोकप्रिय ठरले आहे. त्यामुळेच एखाद्या प्रश्नावर अडवणूक होत असेल किंवा एखाद्या मुद्यावर छळवणूक होत असेल तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठी माणूस विश्वासाने न्यूजटाऊनशी संपर्क साधून आपले गाऱ्हाणे मांडू लागला आहे. हेच न्यूजटाऊनच्या गेल्या सहा वर्षांतील वाटचालीचे मोठे यश आहे, असे आम्ही मानतो.

३१ ऑगस्ट रोजीच न्यूजटाऊनचा प्रारंभ करण्याचे तसे खास कारण आहे. १८७१ मध्ये ब्रिटिश सरकारने बॉम्बे प्रेसिडेन्सी कायद्यांतर्गत गुन्हेगारी जमात कायदा करून देशभरातील भटक्या आणि आदिवासी जमातींना कैदखान्यात डांबून ठेवले. ३१ ऑगस्ट १९५२ रोजी भारत सरकारने हा कायदा रद्द केला आणि या दिवशी गुन्हेगार ठरवलेला भटका- विमुक्त समाज विशेष मुक्त झाला. हाच त्यांचा खरा स्वातंत्र्य दिन. म्हणून ३१ ऑगस्ट रोजीच न्यूजटाऊनचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळेच आज भटके विमुक्त दिन साजरा केला जात असतानाच न्यूजटाऊनही आपला वर्धापन दिन साजरा करत आहे, आमच्यासाठी विशेष अभिमानाची बाब आहे.

लोकशाहीपुरक भयमुक्त समाजाच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन आणि असाच समाज प्रतिबिंबित होईल, अशा सामग्रीची निर्मिती करण्यासाठी न्यूजटाऊन प्रतिबद्ध होता आणि यापुढेही राहील. न्यूजटाऊन हा गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठेचा मानक ठरेल, असाच आमचा प्रारंभापासूनचा प्रयत्न राहिला आहे.

न्यूजटाऊनच्या गेल्या सहा वर्षांच्या वाटचालीत अनेक ज्ञात-अज्ञात हात सातत्याने मदतीसाठी पुढे येत राहिले आहेत. त्यांच्या उदारतेमुळेच न्यूजटाऊनला ही वाटचाल करणे शक्य झाले आहे. त्यामुळे आजवर न्यूजटाऊनच्या पाठिशी उभा राहिलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हातांचे आभार मानणे हे आमचे कर्तव्य समजतो.

स्वारस्य संघर्षविरहित तथ्यांवर आधारित पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ बातम्या, मत-मतांतरे, हस्तक्षेपविरहित वादविवाद अशी भूमिका घेऊन न्यूजटाऊनने सुरू केलेली वाटचाल यापुढेही आपल्या ध्येय्यनिष्ठेशी कुठलीही तडजोड न करता सुरूच राहील, असा विश्वास आम्ही आजच्या वर्धापन दिनी देऊ इच्छितो.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!