
कांशीरामजी यांच्या पश्चात आज त्यांचे महत्व जाणवू लागले आहे. ‘एकच साहेब बाबासाहेब!’ आम्ही अन्य कुणाला मानत नाही असे म्हणणारे देखील कांशीरामजी यांचे कार्य आज मान्य करत आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उर्वरित राजकीय कार्य कांशीरामजी यांनी पूर्ण केले हे त्रिवार सत्य आज उशिरा का होईना मान्य केले जात आहे. मान्यवर कांशीरामजी यांच्यामुळे देशात फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची सत्ता निर्माण होऊ शकली, देशातील बहुजन समाजात एक राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण होऊ शकली!
- इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर, नांदेड
पंचवीस-तीस वर्षांपूर्वी आम्ही एक नारा देत होतो. त्याची आज सर्वत्र प्रचिती येत आहे. तेंव्हा ती चळवळीची जरुरी होती, आज ती देशाची मजबुरी झाली आहे. यावर्षी सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष मान्यवर कांशीरामजी यांची जयंती साजरी करीत आहेत. या निमित्ताने कांशीरामजी यांचे स्मरण केले जात आहे.
बामसेफमध्ये काम करत असताना आम्ही कांशीरामजी घरोघर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यांचा बहुजनवाद समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा लोक नाक मुरडत होते. कोण कांशीराम? काय केले त्यांनी? आम्ही ओळखत नाही कोणत्या कांशीरामजी यांना, असे तेव्हा सर्रास बोलल्या जात होते.
कांशीरामजी यांच्या पश्चात आज त्यांचे महत्व जाणवू लागले आहे. ‘एकच साहेब बाबासाहेब!’ आम्ही अन्य कुणाला मानत नाही असे म्हणणारे देखील कांशीरामजी यांचे कार्य आज मान्य करत आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उर्वरित राजकीय कार्य कांशीरामजी यांनी पूर्ण केले हे त्रिवार सत्य आज उशिरा का होईना मान्य केले जात आहे. मान्यवर कांशीरामजी यांच्यामुळे देशात फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची सत्ता निर्माण होऊ शकली, देशातील बहुजन समाजात एक राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण होऊ शकली!
१९९१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी महोत्सव बहुजन समाज पक्षाने बाबासाहेबांची जन्मभूमी महू (मध्य प्रदेश) येथे साजरा केला. त्यावेळी निघालेल्या पैदल रॅलीत मान्यवर कांशीरामजी यांना अनेक कड्यांमध्ये संरक्षण देण्याचे काम युवा कार्यकर्त्यांनी केले होते. त्या दुसऱ्या कडीमध्ये मी स्वतः होतो. फार जोश होता आमच्यात. घोषणाच एवढ्या भारी होत्या की सबंध आकाश थरथरत होते.
यावेळी मागून कुणी तरी एक नारा दिला… ‘बाबासाहेब का दुजा नाम… कांशीराम… कांशीराम !” कांशीरामजी यांनी लगेच मागे वळून पाहिले आणि बंद करा हा नारा, अशी त्यांनी तंबी दिली. फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा द्यायला सांगितले. लगेच हा नारा बंद झाला. कांशीरामजी स्तुतीप्रिय नव्हते. ते स्वतःला बाबासाहेबांपेक्षा मोठे समजत नव्हते. मी बाबासाहेबांचा एक सेवक, शिपाई आहे असे ते म्हणायचे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्यासाठी खूप काही कार्य करुन ठेवले आहे. फक्त त्या विचारांवर आज प्रामाणिकपणे चालण्याची आम्हाला आवश्यकता आहे असे ते म्हणायचे! पत्रकारांनी एकदा कांशीरामजी यांना प्रश्न विचारला होता की, साहब, आप बहोत मेहनत कर रहे हैं, अखीर आप का ‘मकसद’ क्या है? कांशीरामजी हजर जवाबी होते, ते लगेच म्हणाले होते…‘मेरा कोई मकसद नहीं है, आप को मकसद जानना है तो बुद्ध-रविदास-फुले-शाहू-आंबेडकर के पास जाना होगा! उन का एक मकसद था, मैं तो उन का मकसद पुरा करने के लिये काम कर रहा हूं!! हमारे पुरखों के मकसद के लिये काम करना यह हमारा एक सपना हो सकता है..! मेरा मकसद नहीं, सपना हैं..!!’
पत्रकारांनी पुन्हा विचारले की, ‘आखीर आप का सपना क्या है?’ कुणी सामान्य पुढारी असतील तर बोलले असते की, ‘आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री और प्रधानमंत्री बनना हमारा सपना है!’ पण मान्यवर कांशीरामजी म्हणाले, ‘मेरे सपनों का भारत सम्राट अशोक का भारत है!’
चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या काळातील भारत साकार करणे हे मान्यवर कांशीरामजी यांचे स्वप्न होते. ज्या सम्राट अशोकाचे स्वप्न साकार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय समाविष्ट केले. चक्रवर्ती अशोक चक्र हे भारताच्या तिरंगा झेंड्यावर विराजमान केले, त्या सम्राट अशोकाचे शासन साकार करणे हे मान्यवर कांशीरामजी यांचे स्वप्न होते. गुरु रविदासांचेही तेच स्वप्न होते. बेगमपूर हे त्यांचे राज्य म्हणजे सम्राट अशोकाचे आदर्श राज्य होते. अमेरिकन विदुषी गेल ऑम्वेट यांनी त्यांच्या ‘सिकिंग बेगमपुरा’ या ग्रंथात याचे सविस्तर वर्णन केले आहे.
या सर्व गोष्टी आता सोशल मीडियाच्या या जगात सर्वांना कळू लागल्या आहेत. सोशल मीडियावर रोज कांशीरामजी यांच्या जीवनकार्यावर लेख, भाषणे, मुलाखती प्रसिद्ध होत आहेत. एआय आणि यूट्यूबवर कांशीरामजी रोज पहायला मिळत आहेत. म्हणून सध्या मान्यवर कांशीरामजी यांचा सर्वत्र उदोउदो चालू आहे. यामागे त्यांचा राजकीय उद्देश असला तरीही मान्यवर कांशीरामजी ही आज भारताची मजबुरी झाली आहे, म्हणून तर वामन मेश्राम, चंद्रशेखर आझाद, अखिलेश यादव, राहुल गांधी, संजय राऊत, राज ठाकरे हे मान्यवर कांशीरामजी यांचे मुक्तकंठाने कौतुक करत आहेत.
अगदी भारतीय जनता पक्षाच्या बॅनरवरही कांशीरामजी यांचा फोटो झळकू लागला आहे. यामुळे बहुजन समाजाने फार हुरळून जाण्याची गरज नाही, पण कांशीरामजी आज जरुरी झाले आहेत, देशाची मजबुरी झाले आहेत. कारण लोक आता मोदीला, योगीला आणि फसवणीसला वैतागले आहेत. हे वास्तव लक्षात घेणे जरुरी आहे. म्हणून पंचवीस तीस वर्षांपूर्वी आम्ही दिलेला ‘देश की यह मजबुरी है, कांशीराम जी जरुरी है!’ हा नारा आता सार्थक होऊ पाहत होत आहे! उत्तर प्रदेशनंतर आता देशात कांशीरामजी यांच्या विचारांची सत्ता प्रस्थापित करण्याची ही योग्य वेळ आली आहे..!
