
छत्रपती संभाजीनगर: पाकिस्तानचा कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी मध्यरात्रीपासून छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांत एकाचवेळी धडक कारवाई केली. या मोहिमेत सुमारे १५ तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शहजाद भट्टीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती तपासली जात असून आवश्यकतेनुसार संबंधितांना नोटिसा बजावण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १०, धाराशिवमधील २, बीडमधील १ आणि जालन्यातील २ संशयितांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एटीएस पथकाकडून या १५ जणांची कसून चौकशी सुरू आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना या तीन जिल्ह्यांत गुरुवारी मध्यरात्रीनंतर एटीएसच्या विविध पथकांनी एकाचवेळी शोध मोहीम राबवली. संशयितांच्या घरांवर छापे टाकत त्यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्यांच्या सोशल मीडिया व्यवहारांसह परदेशातील संपर्क, ऑनलाइन संवाद आणि डिजिटल उपकरणांची तपासणी करण्यात येत आहे.
पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेला कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे भारतातील तरुणांशी संपर्क साधत असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. विशेषतः बेरोजगार किंवा असंतुष्ट तरुणांना लक्ष्य करून त्यांच्यामार्फत नेटवर्क विस्तारण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती तपास यंत्रणांकडे आहे. त्याच अनुषंगाने एटीएसने मागील काही दिवसांपासून संशयित सोशल मीडिया खात्यांवर लक्ष ठेवले होते.
यापूर्वी ६ जुलै रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानेही महाराष्ट्रातील काही भागांत अशाच स्वरूपाची कारवाई केली होती. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसने स्वतंत्र तपास सुरू ठेवत गुरुवारी रात्री मोठी मोहीम हाती घेतली. सध्या ताब्यात घेतलेल्या तरुणांची सखोल चौकशी सुरू असून त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘लक्ष्य’ हेरले
कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतातील तरुणांशी संपर्क प्रस्थापित करत असल्याचा भारतीय तपास यंत्रणांना संशय आहे. फॉलोअर्स, ऑनलाइन गट आणि थेट संदेशांच्या माध्यमातून त्याचे नेटवर्क विस्तारण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती तपासात समोर आल्यामुळे अशा संशयित सोशल मीडिया अकाऊंट्सवर तपास यंत्रणांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अशाच संशयित सोशल मीडिया अकाऊंट्स हँडलर्सना एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
डिजिटल पुरावेच तपासाच्या केंद्रस्थानी
एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या तरुणांचे मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट्स, ऑनलाइन चॅट, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल व्यवहारांची तपासणी केली जात आहे. या तपासातून मिळणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना नोटिसा बजावण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पालकांनो सावध व्हा, लक्ष ठेवा!
कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीच्या या नेटवर्कचा धोका पूर्णपणे नष्ट करण्यासाठी एटीएसचे चौकशी सत्र सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, पालकांनी आपल्या मुलांच्या सोशल मीडियावरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे, असे आवाहन सुरक्षा यंत्रणांनी केले आहे.
