सरकार पाडण्याचे काही नियोजन केले का, हे संजय राऊतांनाच विचारतोः शरद पवारांची मिश्कील टिप्पणी


कोल्हापूरः  फेब्रुवारीत शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार आहे, याबाबत मला काहीही माहिती नाही.आता मुंबईला गेल्यावर मी संजय राऊतांशीच बोलेन आणि जाणून घेईन. सरकार पाडण्यासाठी संजय राऊत यांनी काही नियोजन केले आहे का, याबाबत मला माहिती नाही, अशी मिश्कील टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार फेब्रुवारीमध्ये कोसळणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी नुकतच केला आहे. त्यांच्या या दाव्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी ही टिप्पणी केली. आज कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सत्ता हातात असताना जमिनीवर पाय ठेवून वागायचे असते. परंतु सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून ते होताना दिसत नाही. सध्याचे सत्ताधारी इतरांना तुरुंगात डांबण्याची आणि जामीन रद्द करण्याची भाषा करतात. हे राजकीय नेत्यांचे काम नव्हे. काही लोकांनी टोकाला जाण्याची भूमिका घेतली असेल तर ठीक आहे, अशा शब्दात शरद पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारलाही सुनावले.

आम्ही सगळेच राज्यपालांमुळे दुःखीः राज्यपालपदाने पदरात दुःखच पडले, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच केले आहे. त्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, ते दुःखी असतील तर आम्हीही सगळेच दुःखीच आहोत. हे पहिले राज्यपाल आहेत की त्यांच्यावर सतत टीका होत आहे. जनता त्यांच्यावर टीका करत आहे. महाराष्ट्राला दर्जेदार राज्यपालांची परंपरा आहे. राज्यात अनेक चांगले राज्यपाल आले. जे जे राज्यपाल महाराष्ट्र आले, पक्ष कोणताही असो, पण त्यांनी राज्याच्या हिताच्या गोष्टी मांडल्या. त्यांनी संविधानाचे रक्षण केले, असे शरद पवार म्हणाले.

सध्याचे राज्यपाल सतत वादात असतात. त्यांच्या वक्तव्यांची चर्चा होते. ते चुकीची वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे जनतेला त्यांच्याबद्दल नापसंती व्यक्त करावी लागते. राज्यपाल हे महत्वाचे पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. पण ती सध्याच्या राज्यपालांकडून राखली जात नाही, असेही शरद पवार म्हणाले.

कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्याच पाठीशीः शिवसेना पक्षात दोन गट पडले आहेत, ही खरी बाब आहे. मी गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत गेलो आहे. बहुसंख्य कट्टर शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने आहेत. काही आमदार आणि खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेले आहेत. पण निवडणुका लागतील तेव्हा जनतेच्या मनातील खऱ्या भावना लक्षात येतील, असेही शरद पवार म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!