![](https://newstown.in/wp-content/uploads/2023/01/balasaheb-thackery-1024x593.jpg)
मुंबई: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी, २३ जानेवारी रोजी विधानभवनात होणार असल्याची माहिती, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली.
तैलचित्र अनावरण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी ॲड. नार्वेकर यांनी विधानभवनातील त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लोकप्रिय नेतृत्व आणि व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कार्याची आणि योगदानाची ओळख व्हावी त्यानुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तैलचित्राचे अनावरण लवकरात लवकर करावे असे निवेदन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना दिले होते.
त्या निवेदनानुसार अध्यक्षांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच २३ जानेवारी रोजी विधानभवनात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या अनावरण कार्यक्रमाला देशातील आणि राज्यातील मंत्र्यासह खासदार, आमदार आणि कला, क्रीडा, सिनेसृष्टी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी दिली.