मुंबईत इंडिया आघाडीच्या ‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट, कार्यकर्ते-पोलिसांत धुमश्चक्री; अनेक नेत्यांची पोलिसांकडून धरपकड!


मुंबईः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत इंडिया आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट लागले. मुंबईतील फॅशन स्ट्रीटजवळ ही पदयात्रा पोहोचल्यानंतर पोलिसांनी ही पदयात्रा अडवली. त्यामुळे पोलिस आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. त्यातून पोलिसांनी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केल्याचे सांगितले जात आहे.

इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्षांच्या वतीने महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपच्या धोरणाच्या विरोधात ‘मी पण गांधी’ या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, डावे पक्ष आदी घटक पक्षाचे नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ही पदयात्रा मुंबईतील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीटजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांनी ती अडवली. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून इंडिया आघाडीचे कार्यकर्ते पुढे चालू लागले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आणि पोलिसांत धुमश्चक्री झाली. या धुमश्चक्रीनंतर पोलिसांनी इंडिया आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे टीव्ही९ मराठीच्या वृत्तात म्हटले आहे.

इंडिया आघाडीने दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा ते महात्मा गांधी पुतळा अशी पदयात्रा काढण्याची परवानगी मागितली होती. परंतु हे शांतता क्षेत्र असल्यामुळे आणि उच्च न्यायालयाचे वेगवेगळे निर्बंध असल्याचे कारण देत पोलिसांनी या पदयात्रेला परवानगी नाकारली होती. त्यानंतर रीगल सिनेमा गांधी पुतळा या मार्गाने पदयात्रा काढण्यास परवानगी दिली होती. दरम्यान, ही पदयात्रा सुरू होण्यापूर्वीच मेट्रो सिनेमाजवळ जमलेल्या आपच्या जवळपास १०० कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यामुळे आधीच इंडिया आघाडीचे कार्यकर्ते संतप्त झालेले होते.

पदयात्रेवरील या कारवाईमुळे काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीने शांततेच्या मार्गाने पदयात्रा काढली होती. प्रेम आणि सौहार्दाचा संदेश देणे हा या पदयात्रेचा एकमेव हेतू होता. परंतु गांधी जयंतीच्या दिवशीच आमच्या पदयात्रेवर कारवाई करण्यात आली,  असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

आमची पदयात्रा रोखण्याचा प्रयत्न झाला. नथुराम गोडसेचे पुजारी गांधीजींचा आवाज दाबू शकणार नाहीत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा संविधानाने दिलेला आम्हाला दिलेला अधिकार तुम्ही का हिरावून घेत आहात? असा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

दंडेलशाही करण्याचा आदेश पोलिसांना कुणी दिला?

सरकारची ही कारवाई ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीची आठवण करून देणारी आहे. या उन्मत सरकारला आम्ही गांधीजींच्या मार्गानेच विरोध करू. ब्रिटिशांच्या क्रुर आणि अन्याय्य राजवटीत बापूंच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची अशीच धरपकड व्हायची. आज स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी गांधी जंयतीनिमित्त शांततापूर्व पदयात्रेतही पोलिसांची दंडेलशाही सुरू आहे. हे नेमके कोणाचे राज्य सुरू आहे. भारतात लोकशाही असताना शांततेच्या मार्गाने होणाऱ्या पदयात्रेत दंडेलशाही करण्याचा आदेश पोलिसांना कुणी दिला? असा संतप्त सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!