तीन वर्षे लेकीचे नावच ठरेना, बायकोने खेचले नवऱ्याला हायकोर्टात; शेवटी कोर्टानेच केले ‘हा’ अधिकार वापरून मुलीचे बारसे!


कोचीः आपल्या मुलाचे किंवा मुलीचे नाव काय ठेवायचे? हा हल्लीच्या पालकांसाठी मोठा टास्क ठरला आहे. पूर्वीच्या काळी आवडते हिरो-हिरॉइन, नेते, महामानव किंवा देवीदेवतांवरून मुला-मुलींची नावे ठेवली जात होती. परंतु हल्लीच्या काळात हे काम तेवढेसे सोपे राहिलेले नाही. मुला-मुलीचे नाव ठरवण्यावरून कित्येकदा मतभेद होतात, आईवडिलांत भांडणेही लागतात. मुलीचे नाव ठरवण्याचा असाच एक वाद चक्क उच्च न्यायालयात पोहोचला. आई-वडिलांतील वादामुळे तब्बल तीन वर्षे एका मुलीचे नावच निश्चित होत नव्हते. शेवटी न्यायालयानेच ‘पॅरेन्स पॅट्रिया’ अधिकार क्षेत्राचा वापर करून या तीन वर्षीय चिरमुरडीचे बारसे केले आणि नावही ठेवले!

 केरळमधील एका दाम्पत्याला १२ फेब्रुवारी २०२० रोजी मुलगी झाली होती. मुलगी झाल्यानंतर या दाम्पत्याच्या संबंधात दुरावा निर्माण झाला. मुलीच्या जन्म प्रमाणपत्रावर नाव नव्हते. तिची आई तिला शाळेत टाकण्यासाठी गेली, तेव्हा शाळेने जन्मप्रमाणपत्रावर नावच नसल्यामुळे ते स्वीकारण्यास नकार दिला.

त्यामुळे मुलीच्या आईने ‘पुण्या नायर’ असे तिचे नाव नोंदवण्याचा प्रयत्न केला आणि खरी समस्या इथेच सुरू झाली. जन्म-मृत्यू निबंधकांनी मुलीचे नाव नोंदणीसाठी आईवडिल दोघेही आपल्या समक्ष हजर राहणे आवश्यक असल्याचा आग्रह धरला.  

विभक्त झालेल्या या दाम्पत्यामध्ये मुलीचे नाव काय ठेवायचे? यावर एकमत झाले नाही. जवळपास तीन वर्षे उलटली तरी मुलीचे नाव ठरवता येत नसल्यामुळे व्यथित झालेल्या मुलीच्या आईने थेट केरळ उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

मुलीच्या आईवडिलांत सुरू असलेल्या भांडणाचा मुलीच्या कल्याणावर प्रभाव पडता कामा नये, हे लक्षात घेता न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांनी आदेश पारित केला. ‘मुलीला नाव नसणे हे मुलीचे कल्याण आणि सर्वोत्तम हिताच्या दृष्टीने अनुकुल नाही. मुलीला एक नाव दिले गेले पाहिजे, ही मुलीच्या कल्याणाची मागणी आहे. आईवडिलांतील सासत्याची भांडणेही मुलीच्या हिताच्या दृष्टीने चांगले संकेत नाहीत. त्यामुळे या न्यायालयाच्या पॅरेन्स पॅट्रिया अधिकार क्षेत्राचा वापर करण्यासाठीचे हे एक विशेष प्रकरण आहे,’ असे न्यायमूर्ती थॉमस यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

विभक्त झालेल्या दाम्पत्यात नाव ठेवण्यावर सहमती होत नव्हती. मुलीचे वडिल तिचे नाव ‘पद्मा’ ठेवू इच्छित होते. नावावर सहमती होत नसल्यामुळे मुलीच्या आईने केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली. आपला अर्ज स्वीकारून आईच्या पसंतीनुसार ‘पुण्या’ नावाने जन्म प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती तिने न्यायालयाला केली.

न्यायालयाने या वादाचे सर्व पैलू विचारात घेतले. विद्यमान परिस्थितीत मुलगी तिच्या आईकडे रहात असल्यामुळे तिच्या आईने सूचवलेल्या नावाला उचित महत्व देण्यात आले पाहिजे आणि मुलीचे पितृत्व निर्विवाद असल्यामुळे त्या नावासोबत पित्याचे नावही जोडले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले. या आधारावर त्या मुलीचे नाव ‘पुण्या बालगंगाधरन नायर’ किंवा ‘पुण्या बी. नायर’ असे नाव ठेवण्याच्या निर्णयाप्रत उच्च न्यायालय पोहोचले आणि या वादाचा अखेर निकाल लागला.

बाळाचे नाव निवडताना बाळाचे कल्याण, सांस्कृतिक विचार, पालकांचे हित आणि सामाजिक निकष लक्षात घेऊन बाळासाठी नाव निवडले गेले पाहिजे. त्यामुळे आईच्या पसंतीनुसार मुलीचे नाव पुण्या निश्चित करण्यात आले असून वडिलाचे नाव आडनाव म्हणून लावण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

काय आहे पॅरेन्स पॅट्रिया?

पॅरेन्स पॅट्रिया हा लॅटिन भाषेतील शब्द आहे. पॅरेन्स पॅट्रिया हा अल्पवयीन, अज्ञान, अक्षम, पागल व्यक्तींना त्यांचे व्यक्तित्व आणि संपत्तीला सुरक्षा प्रदान करण्याचा अंतर्निहीत शक्ती आणि अधिकार आहे. कायदेशीर पालकांच्या निष्काळजीपणामुळे बाळाच्या कल्याणात अडथळे येऊ नये यासाठी पॅरेन्स पॅट्रिया अधिकार क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!