राज्यात ‘लबाड’ लांडग्यांची संख्या वाढवण्यासाठी सरकारची खास योजना, वाचा काय आहे लांडगा संवर्धनाचा राज्यस्तरीय प्लान!


मुंबईः लांडग्याच्या लबाड स्वभावामुळे बऱ्याच अंधश्रद्धा, दंतकथा व लोककथा प्रसिद्ध आहेत. दंतकथेत ऐकलेल्या याच लांडग्याची झपाट्याने कमी होत असलेली संख्या चिंतेचा विषय ठरला असून आता माळरानावरचा रहस्यमय प्राणी अशी ओळख असलेल्या लांडग्यांची संख्या वाढवण्यासाठी राज्याच्या वन विभागाने खास योजना आखली आहे. लांडगा संवर्धनाचा राज्यस्तरीय आराखडा वन विभागाने विकसित केला असून तो केंद्रीय वन्यजीव मंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

लांडगा हा स्वभावाने लबाड असतो. त्याच्या लबाड स्वभावामुळे बऱ्याच अंधश्रद्धा, दंतकथा आणि लोककथांना जन्म दिला आहे. कधी कधी जंगलात राहणाऱ्या माणसांनी लांडग्यांची पिल्ले छंद व जोडीदार म्हणून पाळली आहेत. सर्व लांडग्यांच्या सवयी बहुधा सारख्याच असतात. बुद्धी, शक्ती व युक्ती याचा मिलाफ लांडग्यात आढळून येतो. एकेकाळी लांडग्याचे कातडे माणूस पोषाखासाठी वापरत असे. दुष्काळी परिस्थितीत त्याचे मांस अन्न म्हणूनही खात असे.

असा हा लांडगा प्राणी महाराष्ट्रात सर्वदूर आढळतो. पुणे जिल्ह्यात लांडग्याची संख्या जास्त आहे. त्यातही सासवड भागात लांगडे अधिक आढळून येतात. पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून लांडग्यांचा अधिवास, त्यांची वसतिस्थाने, समूहस्तरावरील त्याचे वर्तन आणि त्यांच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास सुरू आहे. या अभ्यासातून हाती आलेल्या निष्कर्षाच्या आधारे राज्यस्तरीय लांडगा संवर्धन आराखडा विकसित करण्यात आला आहे.

राज्याच्या वन विभागाने हा लांडगा संवर्धन आराखडा केंद्रीय वन्यजीव मंडळाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. वन्यजीव मंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर राज्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होईल. पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा जिल्ह्यात हा प्रकल्प राबवण्याचा ग्रासलँड ट्रस्ट आणि अशोक ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एन्व्हार्न्मेंटचा प्रस्ताव आहे.

ग्रासलँड ट्रस्ट लांडगा संवर्धानावर काम करत आहे. सासवड, जेजुरी, सुपे, दिवेघाटातील माळराने इत्यादी ठिकाणी लांडग्यांचे चित्रिकरण, नकाशे, छायाचित्रे, त्यांची वसतिस्थाने याचे सखोल अध्ययन केले आहे. त्यातूनच हा लांगडा संवर्धन प्रकल्प आकाराला येत आहे.  या लांडगा संवर्धनातून शाश्वत पर्यटन आणि रोजगार मिळण्याची आशा आहे.

अभ्यासकांच्या मते, भारतातील लांडग्यांची संख्या केवळ दोन ते तीन हजार आहे. लांडग्याचा सर्वाधिक वावर असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने दख्खनचे पठार, धुळे, नंदूरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात लांडगे आढळतात.

लांडगा नेमका असतो तरी कसा?

लांडगा हा सस्तन प्राणी असून त्याचा समावेश सस्तनी वर्गाच्या कॅनिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव कॅनिस ल्युपस आहे. कुत्रा, लांडगा, खोकड, कोल्हा हे सर्व प्राणी कॅनिडी कुलात मोडतात. निर्मनुष्य व ओसाड प्रदेशात विशेषतः माळरानावर लांडगा आढळून येतो.

लांडग्याची लांबी ९० ते १०५ सेंटीमीटर, शूपट ३५ ते ४० सेंटीमीर, व खांद्यापाशी उंची ६५ ते ७५ सेंटीमीर असते. भारताच्या मैदानी प्रदेशातील लांडगा भुरकट तांबूस ते फिकट तपकिरी रंगाचा असून त्याच्या छातीचा व पोटाचा रंग पांढरा किंवा फिकट असतो. त्याच्या अंगावर लहान-मोठे काळे ठिपके असतात.

खांद्यावर गडद रंगातील ‘व्ही’ या इंग्रजी अक्षरासारखी खूण आढळते. त्याचा जबडा लांब आणि सुळे तीक्ष्ण असतात. साधारणतः जबड्याची ठेवण आणि डोळ्यावरून लांडग्याची ओळख पटवता येऊ शकते. हरिण, चितळ, मोर, ससा हे लांडग्याचे प्रमुख खाद्य आहे. साधारणतः १५ ते २० वर्षे इतके त्याचे जीवनमान आहे. भुकेलेला लांडगा वाटेल त्या प्राण्यावर क्रूरपणे हल्ला करून भक्ष्य मरण्याची वाट न पाहता त्याचे लचके तोडून खातो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!