मुंबईः BHIM या भारताच्या डिजिटल चलनाच्या UPI चे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून ठेवल्याचा दावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अकोला येथील प्रचारसभेत केला होता. मोदींचा हा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाने पुरावा देत खोडून काढला आहे. BHIM UPI च्या अधिकृत संकेतस्थळावर या नावाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा काही संबंध असल्याचे कुठेही सांगितलेले नाही, असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोदींच्या या खोट्या बतावणीला दलित बांधव भुलणार नाहीत, असे म्हटले आहे.
चलनामध्ये सातत्याने बदल होत गेले. आज जगभरात डिजिटल चलन व्यवस्था आहे. आपल्या देशाने यूपीआय (Unified Payments Interface) या डिजिटल चलन व्यवस्थेचा अवलंब केला. यूपीआय हा डिजिटल चलन व्यवस्थेतील एक प्रकार आहे. याद्वारे आपण सर्वजण मोबाईलद्वारे पैशांची देवाण-घेवाण करू लागलो आहोत, असे मोदींनी अकोल्याच्या सभेत सांगितले होते.
BHIM या यूपीआयचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरून ठेवल्याचा दावाही मोदींनी या सभेत केला होता. ‘तुम्हाला माहिती आहे का आपण या डिजिटल चलनाचे नाव काय ठेवलं आहे? हा मोदी आहे… या मोदीची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर श्रद्धा आहे. म्हणूनच आम्ही या चलनाला भीम यूपीआय असे नाव दिले आहे. जेणेकरून भविष्यात संपूर्म देश या डिटिजल चलनाचा, डिजिटल ट्रान्जॅक्शनचा वापर करू लागेल किंवा प्रत्येक जण भीम यूपीआयचा वापर करत असेल तेव्हा प्रत्येकाला बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येईल. प्रत्येकाला जाणीव होईल की हे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे,’ असे मोदी म्हणाले होते.
मोदींच्या या दाव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोदी यांचा दावा खोटे बोलून दलित बांधवांना भुलवण्यासाठी केलेली बतावणी असल्याचे सांगत ‘एक्स’ या सोशल मीडियावर भीम यूपीआयच्या संकेतस्थळावरील माहितीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या माहितीमध्ये बाबासाहेबांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही, असे दानवे यांनी म्हटले आहे.
‘BHIM UPI नाव बाबासाहेबांच्या नावावर ठेवलंय अशी अजून एक बतावणी प्रधानमंत्री मोदींनी अकोल्यात केली. मोदीजी, याचा फुलफॉर्म हा Bharat Interface For Money हाच आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिला आहे. इथे तर बाबासाहेबांचे नाव कुठेच नाही! हे खोटं बोलून आमचे दलित बांधव भुलणार नाहीत! हे घ्या पुरावा….’ असे दानवे यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रधानमंत्री मोदी यांच्या दाव्यातील हवाच निघून गेली आहे.