नवी दिल्लीः ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ला निनाचा प्रभाव सक्रीय होण्याची शक्यता असल्यामुळे यंदा भारतात कडाक्याच्या थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असा भारतीय हवामानशास्त्र विभागानाचा अंदाज आहे.
ला निनाच्या प्रभावामुळे तापमानात घट होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार याच महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये ला निनाचा प्रभाव सुरू होण्याची शक्यता आहे. ला निनाचा प्रभाव जर ऑक्टोबरमध्येच सक्रीय झाला तर डिसेंबर २०२४ आणि जानेवारी २०२५ पर्यंत तापमानात लक्षणीय घट होऊ शकते. थंडीची तीव्रता नेमकी किती असेल याचा अंदाज नोव्हेंबरमध्येच बांधता येणार आहे.
तीव्र उष्णतेच्या झळा आणि जास्त पावसाचा मारा सहन केल्यानंतर आता यंदाच्या हिवाळ्यात भारतीयांना तीव्र थंडीचा सामनाही करावा लागू शकतो. विशेष म्हणजे उत्तर भारतात दिल्ली-एनसीआर आणि आजूबाजूच्या प्रदेशात कडाक्याच्या थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१५ ऑक्टोबरपर्यंत मान्सूनची माघार
देशातून येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून निघून जाईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. यावर्षी देशात नेहमीपेक्षा ८ टक्के जास्त पाऊस झाला आहे. सध्या देशात ऑक्टोबरहिटमुळे उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून देशातून निघून गेल्यानंतर ऑक्टोबर हिटच्या झळा आणखी तीव्रतेने बसण्याची शक्यता आहे.
काय असतो ला निना प्रभाव?
ला निनाच्या प्रभावामुळे सर्वसाधारणपणे तापमानात घट होते आणि वातावरणातील गारवा वाढतो. ला निनाच्या प्रभावादरम्यान पूर्वेकडील वारे समुद्राचे पाणी पश्चिमेकडे ढकलतात आणि समुद्राचा पृष्ठभाग थंड करतात. त्यामुळे जेव्हा ला निनाचा प्रभाव असतो तेव्हा सामान्य तापमानापेक्षा जास्त थंडीचा अनुभव येतो.