PET-2024 परीक्षेला जाण्यापूर्वी वाचा हे १४ मुद्दे अत्यंत काळजीपूर्वक, म्हणजे उडणार नाही तुमचा गोंधळ!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणारी पीएच.डी. प्रवेशासाठीची पेट-२०२४ ही परीक्षा आज विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ११ परीक्षा केंद्रावर होत आहे. चार जिल्हयातील ११ केंद्रावर ११ हजार ४६४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात काही शंका आणि प्रश्न आहेत. या परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी काय खबरदारी घ्यावी, याबाबत प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांनी सविस्तर माहिती दिली.

एकूण ४४ विषयांसाठी ही परीक्षा होत असून यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, मानव्यविद्या, आंतरविद्याशाखा, व वाणिज्य या शाखांचा समावेश आहे. चार विद्याशाखेअंतरागत ४४ विषयांसाठी पेट होत असून एकूण ४९७ संशोधन मार्गदर्शकांकडे आजघडीला १ हजार ५७६ जागा रिक्त आहेत. प्रवेशपूर्व प्रक्रिया ’ऑनलाईन’ पध्दतीने राबवण्यात येणार आहे. परीक्षा मात्र ऑफलाइन पद्धतीने होत आहे.

गोंधळू नका, हे १४ मुद्दे वाचा काळजीपूर्वक

  • परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या आधी ४५ मिनिटे पोहोचून रिपोर्टिंग करा. उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
  • तुमच्या हॉल तिकिटावर सांगितलेल्या जागेवरच नुकताच काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवा. राजपत्रित अधिकाऱ्यांकडून हॉल तिकिट अटेस्टेड करून घ्या. ( प्राचार्य, विभागप्रमुख किंवा समकक्ष व्यक्ती अटेस्टेशन करू शकतात.)
  • परीक्षा केंद्रावर येण्यापूर्वीच  अटेस्टेशनच्या वेळीच हॉल तिकिटावर तुमची स्वाक्षरी करा.
  • ओएमआर उत्तरपत्रिकेवर उत्तरे मार्क करण्यासाठी केवळ काळ्या रंगाच्या बॉलपाइंट पेनचाच वापर करा.
  • परीक्षा केंद्रात तुम्हाला दिलेल्या ओएमआर बुकलेटवर आवश्यक ती माहिती आवश्यक त्या रकान्यात अचूकतेने लिहा. ओएमआर बुकलेटवर तुमच्याकडून काही चूक झाल्यास तुम्हाला अतिरिक्त म्हणजे दुसरे बुकलेट दिले जाणार नाही, हे लक्षात ठेवा.
  • तुमचा परीक्षेचा बैठक क्रमांक १६ आकडी आहे. तो तुमच्या हॉल तिकिटावर दिलेला आहे. तोच बैठक क्रमांक ओएमआर बुकलेटवर आणि प्रश्नपत्रिका बुकलेटवर दिलेल्या ठिकाणी अचूक लिहा.
  • तुमचे हॉल तिकिट आणि प्रश्नपत्रिकेवर दिलेला विषय संकेतांक म्हणजेच सब्जेक्ट कोड ओएमआर बुकलेटवर सर्कल मार्किंग करून अचूक लिहा. विषयाचे नाव, परीक्षा केंद्र आणि परीक्षेची तारीख दिलेल्या रकान्यात लिहा.
  • तुम्हाला दिलेल्या ओएमआर बुकलेटचा नंबर प्रश्नपत्रिकेवर निश्चित केलेल्या जागेवर लिहा.
  • उत्तरांचे पर्याय ठळकपणे मार्क करा. एकाच प्रश्नाच्या उत्तरासाठी अनेक पर्यायांचे मार्किंग टाळा, असे केल्यास ही उत्तरे विचारात घेतली जाणार नाहीत.

प्रत्येक प्रश्नाला उत्तरासाठी (A) (B) (C) (D) असे चार पर्याय दिलेले आहेत. अचूक उत्तराच्या पर्यायाचे सर्कल काळ्या बॉलपाँइट पेनने डार्क करा.

उत्तर कसे लिहायचे?:  ज्या प्रश्नाचे (C) आहे, तेव्हा अचूक उत्तर लिहिण्याची पद्धत अशीः

  • तुम्हाला परीक्षेसाठी १ तास म्हणजेच ६० मिनिटांचा वेळ दिलेला आहे. या ६० मिनिटात तुम्हाला ५० प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरे सहजपणे येतात, त्या प्रश्नांची उत्तरे आधी लिहा. त्यानंतर थोडी शंका असलेल्या प्रश्नांकडे वळा. नंतर उर्वरित वेळात ज्या प्रश्नांच्या उत्तरांबाबत तुम्ही साशंक आहात, त्यावर विचार करून उत्तरे लिहा.
  • चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग किंवा पेनाल्टी नाही. त्यामुळे विश्वासाने परीक्षेला सामोरे जा.
  • तुम्हाला दिलेल्या प्रश्नपत्रिकेत बहुपर्यायी ५० प्रश्न आहेत. एका प्रश्नाला प्रत्येकी २ गुण आहेत. प्रत्येक प्रश्न अनिवार्य आहे. त्यामुळे ओएमआर बुकलेटवर प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराच्या पर्यायाचे सर्कल अचूकतेने डार्क करा.
  • शेवटी ओएमआर बुकलेटबरोबरच प्रश्नपत्रिका बुकलेटही पर्यवेक्षकाकडे परत करा. तुम्हाला प्रश्नपत्रिका सोबत घेऊन जाण्याची परवानगी नाही.
  • आणि सर्वात महत्वाचे ही शेवटची पेट आहे. यानंतर तुम्हाला पीएच.डी.ला प्रवेश हवा असेल तर यूजीसीची नेट परीक्षाच उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. त्यामुळे विश्वास आणि निर्धाराने ही परीक्षा द्या, बेस्ट लक!
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!