अखेर छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश,धनंजय मुंडेंमुळे रिक्त झालेल्या जागी वर्णी


मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा अखेर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांची वर्णी लागली आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भुजबळामना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर नवीन मंत्रिमंडळात भुजबळांना डावलण्यात आले होते. त्याबाबतची नाराजी त्यांनी बोलूनही दाखवली होती. त्यांच्या या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार अशी चर्चाही सुरू झाली होती. मात्र आता सहा महिन्यांनंतर भुजबळांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधान परिषदेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी छगन भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांची अनुमती मागितली. त्यानंतर राज्यपालांनी छगन भुजबळ यांना शपथ दिली. शपथविधी नंतर राज्यपालांनी भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

भुजबळांचा परिचय
जन्म: १५ ऑक्टोबर १९४७.
जन्म ठिकाण: नाशिक.
शिक्षण: एल.एम.ई. (आय), (मेकॅनिकल इंजिनिअर).
ज्ञात भाषा:मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती: विवाहित, पत्नी श्रीमती मीना.
अपत्ये: एकूण १ (एक मुलगा).
व्यवसाय: शेती.
पक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
मतदारसंघ: ११९ – येवला, जिल्हा-नाशिक.
भुजबळांचा राजकीय प्रवास
संस्थापक-अध्यक्ष, मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट, बांद्रा, मुंबई. माजी विश्वस्त, व्ही. जे. टी. आय. संस्था, मुंबई. विश्वस्त, नायर रुग्णालय, विश्वस्त, प्रिन्स आगा स्थान रुग्णालय, मुंबई.
संस्थापक, महात्मा फुले समता परिषद, या संस्थेमार्फत उपेक्षित पद-दलित, मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तसेच, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहु महाराज यांच्या विचारांचा व आदर्शाचा प्रचार व प्रसार. ५ नोव्हेंबर २०१० रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मुंबई भेटी दरम्यान महात्मा फुले यांनी लिहिलेल्या ‘गुलामगिरी’ या पुस्तकाचा ‘स्लेव्हरी’ हा अनुवादित ग्रंथ भेट दिला.
माजी विश्वस्त, मुंबई पोर्ट ट्रस्ट.
१९८५ मध्ये ‘दैवत’ व १९९०मध्ये ‘नवरा बायको’ या मराठी चित्रपटांची निर्मिती.
मुंबई महानगरपालिकेचे १९७३मध्ये नगरसेवक, १९७३-८४ मध्ये विरोधी पक्षनेते, १९८५ व १९९१ मध्ये महापौर. याकाळात गृहनिर्माण, झोपडपट्टी सुधारणा, मुंबई शहराचे सौंदर्यकरण, चौकांचे सुशोभिकरण, हुतात्मा चौकाचे सुशोभिकरण केले; १९९१ अध्यक्ष, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स.
१९९१ पर्यंत शिवसेनेत विविध पदावर कार्य. १९९१ नंतर काँग्रेस पक्षात कार्यरत. जून १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक-सदस्य व जून १९९९ ते नोव्हेंबर १९९९ महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष.
१९८५-९०, १९९०-९५, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ काळात महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य. १९९६-२००२ व २००२-२००४ या काळात महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य.
डिसेंबर १९९१ ते मार्च १९९३ दरम्यान महसूल खात्याचे मंत्री.
मार्च १९९३ ते मार्च १९९५ दरम्यान गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, घरदुरुस्ती आणि पुनर्बाधणी खात्याचे मंत्री. १९९६-१९९९ दरम्यान महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते.
ऑक्टोबर १९९९ ते जानेवारी २००३ दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह आणि पर्यटन मंत्री.
नोव्हेंबर १९९९ ते जानेवारी २००३ दरम्यान मुंबई शहराचे पालकमंत्री.
जानेवारी २००३ ते डिसेंबर २००३ दरम्यान उपमुख्यमंत्री व गृह मंत्री.
नोव्हेंबर २००४ ते ऑक्टोबर २००९ दरम्यान सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्री.
नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१० दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याचे मंत्री.
नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१४ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री. या काळात दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाची वास्तू उभी केली.
ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड
जानेवारी २०२० मध्ये अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री.
नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड
छंद:क्रिकेट, चित्रपट, वाचन व प्रवास
परदेश प्रवास: १९८० आणि १९८६ मध्ये अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, नेदरलैंड आणि रशिया या देशाचा अभ्यास दौरा; १९९१ मध्ये ओसाका, जपान येथे जागतिक महापौर परिषदेसाठीच्या शिष्टमंडळासमवेत सहभाग.
ऑक्टोबर २००० मध्ये फ्रान्स, जर्मनी व इंग्लंड, दुबई, मस्कत, अबुधाबी, कॅनडा, फ्रान्स, नेदरलँड, बेल्जिअम व स्वित्झर्लंड इत्यादी देशांचा अभ्यास दौरा, याच दौऱ्यात लंडन मधील स्कॉटलैंड वार्ड पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा.
२८ मे २००१ ते १८ जून २००१ या काळात न्युयॉर्क, जिनिव्हा, लंडन इत्यादी देशांचा अभ्यास दौरा तसेच ऑस्ट्रिया, स्वीडन, नॉर्वे, स्पेन इत्यादी देशांचा अभ्यास दौरा.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!