छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील दलित कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर सवर्ण नराधमांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मराठवाड्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. छत्रपती संभाजीनगरातील (औरंगाबाद) आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी अत्याचार पीडित कुटुबांची भेट घेऊन या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्याची मागणी केल्यानंतर या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.
पैठण तालुक्यातील तेलवाडी येथे नवव्या वर्गात शिकत असलेल्या दलित कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर गावातीलच सवर्ण नराधमांनी बलात्कार केला. पैसा आणि राजकीय वरदहस्त वापरून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप छत्रपती संभाजीनगरातील आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगरातील आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांनी नुकतीच तेलवाडी येथे जाऊन अत्याचार पीडित कुटुंबाची भेट घेतली. या कार्यकर्त्यांनी पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी बहुरे यांना तेलवाडी येथे बोलावून घेतले आणि अत्याचार पीडित कुटुंबाच्या घराला तत्काळ पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करून अत्याचार पीडित कुटुंबाच्या घराला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.
तेलवाडी बलात्कार प्रकरणात दाखल करण्यात आलेला एफआयआर आरोपींना पळवाट शोधून नामानिराळे होण्यास मदत करणारा असल्यामुळे या प्रकरणात तत्काळ कलम १६४ नुसार फेरजवाब नोंदवण्यात यावा. या प्रकरणी अत्याचर पीडित कुटुंबाला धमकावणारा आरोपीचा काका आणि त्याला मदत करणारे पोलिस निरीक्षक यांची चौकशी करून त्यांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात यावे आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, अशा मागण्या या नेते आणि कार्यकर्त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी बहुरे यांच्याकडे केली.
तेलवाडी येथे गेलेल्या आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबाला आर्थिक मदतही केली. अत्याचार पीडित कुटुंबाच्या पाठीशी आंबेडकरी चळवळ ठामपणे उभी असून त्यांना न्याय मिळवून देण्यास कटिबद्ध आहे. पक्ष, नेता, संघटना असा भेद विसरून आंबेडकरी अनुयायी म्हणून अत्याचार पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे असल्याचे या नेते व कार्यकर्त्यांनी यावेळी दाखवून दिले.
यावेळी दीपक निकाळजे, अरविंद कांबळे, डॉ. दीपक खिल्लारे, मनीष नरवडे, नागेश केदारे, पवन पवार, सचिन जोगदंड, संतोष चव्हाण, अनामी मोरे, रामराम नरवडे, त्रिशरण गायकवाड, सचिन शिंगाडे, संदीप आहिरे, शुभम बनकर यांच्यासह समाजहितासाठी कायम तत्पर असलेले व सामाजिक अस्मिता जिवंत असलेले भिमसैनिक उपस्थित होते.