
मुंबईः भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कपातीची घोषणा केली आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दरात ०.२५ बेसिस पॉइंटची कपात केली आहे. मंदावलेल्या वाढीच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
रेपो दरात ०.२५ बेसिस पॉइंटची कपात करून तो ६ टक्क्यावर आणण्यात आल्यामुळे त्याच्याशी जोडलेले सर्व बाह्य बेंचमार्क कर्ज दर (एबीएलआर) त्याच फरकाने कमी होतील. या निर्णयामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील समान मासिक हप्ते (ईएमआय) ०.२५ बेसिस पॉइंटने कमी होणार असल्यामुळे कर्जदारांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दरात ०.२५ बेसिस पॉइंटची कपात केली होती. या कपातीनंतर बँकांनी त्यांचे रेपो लिंक्ड बाह्य बेंचमार्क आधारित कर्ज दर समान प्रमाणात कमी केले आहेत.
आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) बैठक तीन दिवस चालली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती आरबीआयचे गव्हर्नर संजय मलहोत्रा यांनी आज माध्यमांना दिली. नवीन आर्थिक वर्षात झालेली ही एमपीसीची पहिलीच बैठक होती. एमपीसीने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे संजय मलहोत्रा म्हणाले.
नवीन आर्थिक वर्षाची सुरूवात खूप गोंधळाने झालेली आहे. व्यापाराबाबत काही भीती खऱ्या ठरत आहेत. त्यामुळे जागतिक समुदाय चिंतेत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने किंमत स्थिरता आणि नियमित वाढीच्या बाबतीत चांगली प्रगती केली आहे. जगातील आर्थिक दृष्टिकोन वेगाने बदलत आहे, असे मलहोत्रा म्हणाले. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर विकासाला चालना देण्यासाठी आरबीआयकडून रेपो दरात कपात करण्याची ही सलग दुसरी वेळ आहे.
