दिल्लीत ‘हिंदू राष्ट्रा’च्या पहिल्या जिल्ह्याची घोषणा,  एफआयआर दाखल


नवी दिल्लीः उत्तर-पूर्व दिल्लीला हिंदू राष्ट्राचा पहिला जिल्हा बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. संयुक्त हिंदू मोर्चाच्या वतीने पूर्वोत्तर दिल्लीच्या करावलनगरमध्ये भाजप नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली हिंदू राष्ट्र पंचायतमध्ये ही घोषणा करण्यात आली. २०२५ मध्ये आरएसएसच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होण्याआधीच देशाला ‘हिंदू राष्ट्र’ बनवण्याचे स्वप्न असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आता एफआयआर दाखल केला आहे.

संयुक्त हिंदू मोर्चाच्या वतीने ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या हिंदू राष्ट्र पंचायतीमध्ये ‘हिंदू राष्ट्र’ निर्माण करण्याचा आणि लव्ह जिहादच्या पाठीशी असलेल्या लोकांविरुद्ध कारवाई करण्याचा आग्रह धरण्यात आला. विशेष म्हणजे या हिंदू राष्ट्र पंचायतीचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पोलिसांची परवानगीच घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भादंविच्या कलम १८८ नुसार आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यांनी कार्यक्रमाची परवानगी घेतली नव्हती, असे पूर्वोत्त दिल्लीचे पोलिस उपायुक्त जॉय तिर्की यांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

भाजपचे सदस्य आणि संयुक्त हिंदू मोर्चाचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष जयभगवान गोयल यांनी या हिंदू राष्ट्र पंचायतीचे आयोजन केले होते. आमचा उद्देश पूर्वोत्तर दिल्लीला पहिला हिंदू राष्ट्र जिल्हा बनवणे हा आहे. २०२५ मध्ये आरएसएसच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचे स्वप्न आरएसएसला पूर्ण करायचे आहे, असे जयभगवान गोयल म्हणाले.

आपली घरे मुस्लिमांना विकू नका आणि त्यांच्याशी व्यापार- व्यवसायही करू नका, असे आवाहनही गोयल यांनी करावलनगरच्या रहिवाश्यांना केले. उत्तरपूर्व दिल्लीतील दंगलीचा उल्लेख करून या भागाला ‘मिनी पाकिस्तान’ बनवण्याची योजना होती, असा आरोपही त्यांनी केला. आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी पंचायत आणि विधानसभास्तरावर शाखा स्थापन करत आहोत, असेही गोयल म्हणाले.

या कार्यक्रमाला  भाजपच्या संसदीय बोर्डाचे ज्येष्ठ सदस्य व माजी केंद्रीय मंत्री डॉ. सत्यनारायण जटिया आणि भाजप सदस्य राम अवतार गुप्ता यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात सहभागी नागरिकांना शिवास्त्र वाटण्यात आले, त्यांना हिंदू राष्ट्राची शपथ देण्यात आली आणि त्यांच्या छातीवर जय हिंदू राष्ट्र असा बिल्ला लावण्यात आला.

या हिंदू राष्ट्र पंचायतीच्या आयोजनावरून वाद निर्माण झाल्यानंतर दिल्ली भाजपच्या प्रवक्त्याने या आयोजनाला पक्षाची मंजुरी नव्हती आणि जयभगवान गोयल भाजपमध्ये कोणत्याही पदावर नाहीत, अशी सारवासारव केली. या हिंदू पंचायतीत अभद्र भाषाही वापरण्यात आली. पोलिस आता त्याचाही तपास करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!