थिरुअनंतपूरमः केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असून धुवांधार पावसामुळे अनेक सेवा विस्कळित झाल्या आहेत. केरळच्या अनेक भागात बुधवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनला आणखी एक आठवडा बाकी असतानाच केरळच्या अनेक भागांत पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने केरळमधील दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
विशेष म्हणजे ३१ मे रोजी मोसमी पावसाचे केरळ किनारपट्टीवर आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने आधीच वर्तवला आहे. मोसमी पावसाच्या वाटचालीस पोषक स्थिती असल्यामुळे केरळमध्ये मोसमी पाऊस वेळेत दाखल होण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये दाखल झालेला मान्सूनपूर्व पाऊस हे मोसमी पावसाच्या वाटचालीच्या दृष्टीने सकारात्मक चिन्ह मानले जात आहे.
दरम्यान, केरळ किनारपट्टीपासून दक्षिणपूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुढील दोन दिवस केरळमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
केरळच्या एर्नाकुलम आणि त्रिशूर जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासूनच पावसाने थैमान घातले आहे. या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून इतर आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संपूर्ण केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सक्रीय झाला आहे.
दरम्यान मान्सूनपूर्व पावसाच्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी लोकांना सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. अचानक ढगफुटी किंवा पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते तसेच सखल भागात भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाला सतर्क रहाण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
१० ते ११ जूनला मान्सून महाराष्ट्रात
नैऋत्य मोसमी वारे सर्वप्रथम अंदमान- निकोबार बेटावर दाखल होतात. तेथून ते केरळच्या किनारपट्टीवर धडकतात. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मान्सून महाराष्ट्रासह देश व्यापतो. केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस ३१ मेपर्यंत दाखल होईल. महाराष्ट्रात १० ते ११ जूनपर्यंत मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. यंदा देशभरात मान्सूनचा पाऊस सामान्य रहाण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.