मुंबई: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांसाठी निवडणूक होत असून या चार मतदारसंघांत २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाने ८ मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण विभाग पदवीधर तसेच नाशिक विभाग व मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्या वेळापत्रकानुसार या चार मतदारसंघात १० जून रोजी मतदान आणि १३ जून रोजी मतमोजणी होणार होती. परंतु शिक्षक संघटनांनी या निवडणूक कार्यक्रमाबाबत नाराजी व्यक्त करत निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि आमदार कपिल पाटील यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यानंतर आयोगाने ही निवडणूक पुढे ढकलली आहे.
आता या चारही मतदारसंघातील निवडणुकीसाठी ३१ मे रोजी अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर ७ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छानणी १० जून रोजी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १२ जून अशी आहे.
२६ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. १ जुलै रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक ५ जुलै रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
आ. कपिल पाटलांसह या सदस्यांचा संपणार कार्यकाळ
मुंबई पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर भिकाजी दराडे, आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार कपिल हरिश्चंद्र पाटील हे सदस्य ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.