छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणा-या ’पीएच.डी’ प्रवेश परीक्षा अर्थात पेटची जय्यत तयारी झाली आहे. चार जिल्हयातील ११ केंद्रावर ११ हजार ४६४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने घेण्यात येत असलेल्या पेट-२०२४ साठी ११ हजार ४६४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. दोन वेळा संधी देऊनही मूळ शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करू न शकल्यामुळे ६६४ जण अपात्र ठरले आहेत. जुन अखेरीस ‘पेट’चे वेळापत्रक घोषित करण्यात आले.
आवश्य वाचाः PET-2024 परीक्षेला जाण्यापूर्वी वाचा हे १४ मुद्दे अत्यंत काळजीपूर्वक, म्हणजे उडणार नाही तुमचा गोंधळ
१ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘समर्थ पोर्टल’ द्वारे ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. या दरम्यान १७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात अर्जातील त्रुटी संबंधित विद्यार्थ्यांना कळवून पूर्ततेची संधी देण्यात आली. यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून १० सप्टेंबरला प्राथमिक यादी प्रकाशित करण्यात आली. यानंतरही संबंधित विद्यार्थ्यांना अर्जातील त्रुटी करून पूर्तता करण्याची दुसऱ्यांदा संधी देण्यात आली.
त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी पेटसाठी पात्र, अपात्र व परीक्षेत सूट देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी घोषित करण्यात आली. एकूण १४ हजार १२५ आवेदन प्राप्त झालेले आहेत. यामध्ये ११ हजार ४६४ विद्यार्थी हे ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पेट साठी पात्र ठरले आहेत. १ हजार ९९७ विद्यार्थ्यांना पेटमधून सूट देण्यात आली आहे. तर दोन वेळा संधी देऊन ही मूळ शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करू न शकल्यामुळे ६६४ जण ‘पेट’साठी अपात्र ठरले आहेत.
कोण व का ठरले अपात्र?
विशेष म्हणजे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र , नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आदी कारणांमुळे कोणाचाही अर्ज अपात्र ठरवण्यात आलेला नाही. पदवीधर पदवीची गुणपत्रिका न जोडणे, निकाल पूर्ण नसणे, संबंधित विषय सोडून दुसऱ्या विषयात अर्ज करणे आदी कारणांमुळे हे विद्यार्थी पेट चाचणी देण्यास अपात्र ठरले आहेत. संबंधित विभागात अर्जांची छाननी करण्यात आली. पेट सेल व युनिकच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
अधिष्ठाता मंडळाचे अध्यक्ष प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन पेटची सविस्तर नियमावली तयार करून वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. ’पेट’साठी चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र शिरसाठ, डॉ.संजय साळुंके, डॉ.वैशाली खापर्डे, डॉ.वीना हुंबे, मंडळ सचिव डॉ.भालचंद्र वायकर तसेच परीक्षा मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळी, युनिटचे संचालक डॉ. प्रवीण यन्नावार आदींसह सहकारी प्रयत्नशील आहेत.
एकूण ४४ विषयांसाठी ही चाचणी होणार असून यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, मानव्यविद्या, आंतरविद्याशाखा, व वाणिज्य या शाखांचा समावेश आहे. चार विद्याशाखेअंतरागत ४४ विषयांसाठी पेट होत असून एकूण ४९७ संशोधन मार्गदर्शकांकडे आजघडीला १ हजार ५७६ जागा रिक्त आहेत. प्रवेशपूर्व प्रक्रिया ’ऑनलाईन’ पध्दतीने राबवण्यात येणार आहे.
तुमचा नंबर कोणत्या सत्रात?
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्हयात सदर चाचणी होणार असून छत्रपती संभाजीनगर जिल्हयात सर्वाधिक पाच केंद्र तर अन्य तिन्ही जिल्हयात प्रत्येकी दोन महाविद्यालयात ही परीक्षा होईल. यामध्ये सकाळच्या सत्रात १० वाजता, १२ वाजता तर दुपारच्या सत्रात ३ वाजता, ५ वाजता ही चाचणी होईल.
प्रत्येक केंद्रावर विद्यापीठाच्यावतीने दोन निरीक्षक देण्यात आले आहेत. तसेच चारही अधिष्ठाता जिल्हयाचे निरीक्षक असणार आहेत. या संदर्भात प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.
कसा असेल पेपर आणि गुणांकन?
- पेट-२०२४ परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. परीक्षेची प्रवेश प्रक्रियाच ऑनलाइन पद्धतीने होईल.
- पेट-२०२४ परीक्षेसाठी ५० प्रश्नांची प्रश्नपत्रिका दिली जाईल. हे ५० प्रश्न विद्यार्थ्याने ज्या विषयासाठी अर्ज केलेला आहे, त्याच विषयाशी संबंधित असतील. सामान्य ज्ञानाचे प्रश्न अजिबात असणार नाहीत.
- एका प्रश्नासाठी प्रत्येकी दोन असतील. म्हणजेच ही परीक्षा एकूण १०० गुणांची असेल. ही प्रश्नपत्रिका बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.
- पेट-२०२४ परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थ्यांना ओएमआर उत्तरपत्रिका दिली जाणार आहे. स्पर्धा परीक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांना योग्य उत्तराचा पर्याय बॉलपेनने वर्तुळाकार गडद करायचा आहे.
- पेट-२०२४ मध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. म्हणजेच विद्यार्थ्यांनी चुकीची उत्तरे दिल्यास त्यांना मिळालेल्या एकूण गुणांतून चुकीच्या उत्तरासाठीचे गुण वजा केले जाणार नाहीत.
- या परीक्षेसाठी एक तासाच्या अवधी असणार आहे. विद्यार्थ्यांना ४५ मिनिटे अगोदर केंद्रावर उपस्थित रहावे. गैरसोय टाळण्यासाठी विदयार्थ्यांनी त्यांची प्रवेश पत्र आज साक्षांकित करून घ्यावीत.