राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक, हा बहुमान पटकावणाऱ्या त्या ठरल्या पहिल्या महिला अधिकारी!


मुंबईः भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी सुजाता सौनिक यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज रविवारी सायंकाळी विद्यमान मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडून पदभार स्वीकारला. महाराष्ट्राचे मुख्य सचिवपद भूषवणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार आहेत.

यापूर्वी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी राहिलेल्या चंद्रा अय्यंगार, चित्कला झुत्शी आणि मेधा गाडगीळ या तीन आयएएस अधिकारी राज्याच्या मुख्य सचिवपदाच्या दावेदार होत्या. परंतु त्यांना ही संधी मिळू शकली नाही. त्यामुळे सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक हे एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३ या काळात राज्याचे मुख्य सचिव होते.  निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. सुजाता सौनिक यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारल्यामुळे राज्याचे मुख्य सचिवपद भूषवणार सौनिक हे देशातील पहिलेच दाम्पत्य ठरले आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे मुदतवाढ देण्यात आलेले मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे आज निवृत्त झाले आहेत. ३१ डिसेंबर २०२३ रोजी राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेले डॉ. करीर हे ३१ मार्च रोजीच सेवानिवृत्त होणार होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्य सचिवपदासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या एकाच नावाचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. आयोगाने हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने मुख्य सचिवपदासाठी सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल आणि महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार मीना यांच्या नावाची शिफारस केली होती. परंतु निवडणूक आयोगाने या तिघांच्याही नावाची शिफारस विचारात न घेता डॉ. करीर यांनाच तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती.

सुजाता सौनिक या १९८७ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून मुख्य सचिवपदावर नियुक्ती होण्यापूर्वी त्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव होत्या. त्यांच्यापाठोपाठ १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आणि महसूल अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार मीना आणि १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी व मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल हे मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत होते.

 सुजाता सौनिक यांचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण पंजाबमधील चंदीगड येथे झाले आहे. त्यांनी पंजाब विद्यापीठातून इतिहास विषय घेऊन पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. आपल्या ३७ वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासन विभाग व कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृह विभाग, राज्य सरकारच्या सल्लागार आणि सहसचिव म्हणूनही त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *