मोबाइल वापरण्यास आडकाठी केली म्हणून पत्नीची पतीला अमानुष मारहाण, संतापाच्या भरात दिले वीजेचे शॉक!


मैनपुरी (उत्तर प्रदेश): दिवसरात्र मोबाइलमध्ये डोके खूपसून बसणाऱ्या पत्नीचा मोबाइलचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे पतीला चांगलेच महागात पडले आणि त्याला त्याची जबर किंमत मोजावी लागली. पतीने मोबाइल काढून घेतल्यामुळे संतापलेल्या पत्नीने पतीला अमानुष मारहाण केली आणि संतापाच्या भरात त्याला खुर्चीला बांधून विजेचे शॉकही दिले. उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

३३ वर्षीय महिला दिवसरात्र मोबाइलमध्ये डोके खूपसून बसत असल्यामुळे तिचा मोबाइलचा वापर कमी व्हावा, यासाठी तिचा पती प्रयत्नशील होता. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून त्याने तिच्याकडून मोबाइल काढून घेतला. त्यामुळे संतापलेल्या ३३ वर्षीय पत्नीने आधी पतीला अमानुष मारहाण केली. नंतर त्याला खुर्चीला बांधून विजेचे शॉक दिले.

 १४ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र या महिलेने त्यालाही मारहाण केली. पत्नीच्या मारहाणीत जबर जखमी झालेला पती प्रदीप सिंहवर सैफई वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू असून या अमानुष कृत्यानंतर पत्नी फरार झाली आहे.

प्रदीप सिंह यांचे बेबी यादव या महिलेशी २००७ मध्ये लग्न झाले होते. माझी पत्नी दिवसभर कुणाशी तरी फोनवर बोलत बसते. मी यावर आक्षेप घेत तिच्या माहेरीही कळवले होते. तिच्या घरच्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी तिचा मोबाइल काढून घेतला. त्यामुळे संतापून पत्नीने मला व माझ्य मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली, असे प्रदीप सिंहने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

मागच्या आठवड्यात तिने मला जबर मारहाण केली. क्रिकेटच्या बॅटने माझ्यावर हल्ला केला. त्यामुळे माझ्या डोक्याला आणि शरीरावर जबर जखमा झाल्या आहेत. एवढ्यावरच न थांबता तिने मला खुर्चीला बांधून विजेचे शॉकही दिले. माझ्या मुलाने मला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तिने त्यालाही मारहाण केली, असेही प्रदीप सिंह यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

पती प्रदीप सिंह यांच्या फिर्यादीवरून किशनी पोलिस ठाण्यात पत्नी बेबी हिच्याविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), कलम ३२८ आणि कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पत्नी बेबी फरार असून तिचा शोध घेण्यात येत असल्याचे किशनी पोलिस ठाण्याचे प्रमुख अनिल कुमार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *