महाराष्ट्रात ‘भारत जोडो यात्रे’ला अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ, राहुल गांधी म्हणाले, ही पदयात्रा कोणीही रोखू शकणार नाही!


देगलूरः काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचे सोमवारी रात्री तेलंगणातून महाराष्ट्रात देगलूरमध्ये आगमन झाले. भारत जोडो यात्रा देगलुरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी या यात्रेचे अभूतपूर्व स्वागत केले. देगलूर येथील ऐतिहासिक गुरूद्वारात दर्शन घेतल्यानंतर ही यात्रा आज पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. काश्मीर ते कन्याकुमारी अशी काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा प्रवास करून ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ही भारत जोडो यात्रा एकूण ३ हजार ५७० किलोमीटर प्रवास करणार असून या यात्रेला ठिकठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

 सोमवारी रात्री देगलुरात या यात्रेचे आगमन झाल्यानंतर राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केले. महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून करत आहे, ही अभिमानाची बाब आहे, असे राहुल गांधी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे महागाई आणि बेरोजगारीवर बोलायला तयार नाहीत. गॅसचे दर वाढले, पेट्रोल आणि डिझेलचे भाव कुठे गेले? यावर मोदी काहीच बोलत नाहीत. हा आवाज बुलंद करण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे सुख-दुःख, प्रश्न जाणून घेण्यासाठी आम्ही पदयात्रेत सर्वांशी संवाद साधत आहोत, असे राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

”देशात गेल्या काही वर्षांपासून द्वेष, क्रोध आणि हिंसेचे वातावरण तयार केले जात आहे. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी निघालेली ही भारत जोडो पदयात्रा आता कोणीही रोखू शकणार नाही.’’

राहुल गांधी,काँग्रेस नेते.

आज सकाळी राहुल गांधी यांनी देगलूर येथील ऐतिहासिक बाबा जोरावरसिंग बाबा फतेहसिंगजी यांच्या गुरूद्वारास भेट दिली आणि परस्पर सौहार्द आणि समानतेसाठी त्यांनी प्रार्थना केली तसेच गुरूनानक जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता या यात्रेला सुरूवात झाली. अटकाळी, खतगाव फाटामार्गे ही भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात मार्गक्रमण करेल.

महाराष्ट्रात १४ दिवसः राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही सहभागी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ही यात्रा १४ दिवस राहील. ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील १५ विधानसभा आणि ६ लोकसभा मतदारसंघातून ३८१ किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

असा असेल यात्रेचा प्रवासः महाराष्ट्रातील १४ दिवसांच्या मुक्कामात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ ते ११ नोव्हेंबर दरम्यान नांदेड जिल्ह्यात, ११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान हिंगोली जिल्ह्यात, १५ ते १६ नोव्हेंबरदरम्यान वाशिम जिल्ह्यात, १६ ते १८ नोव्हेंबर असे तीन दिवस अकोला जिल्ह्यात आणि १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान बुलडाणा जिल्ह्यातून मार्गक्रमण करत जाईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!