छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मुंबईतील सीएसटी आणि ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामासाठी रेल्वेने आजपासून तीन दिवसांचा महामेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेने त्याच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वे प्रवाश्यांना मुंबईला जाण्यासाठी आणि मुंबईहून मराठवाड्यात येण्यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.
नॉन-इंटर लॉक वर्किंग ब्लॉक आणि ट्रॅफिक ब्लॉकमुळे दक्षिण मध्ये रेल्वे मार्गावरील बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स रेल्वे स्थानक आणि ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी आज शुक्रवारी (३१ मे) मध्यरात्रीपासून शनिवारी (१ जून) संपूर्ण दिवस आणि रविवारी (२ जून) दुपारपर्यंत असा तीन दिवसांचा महामेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सीएसटी रेल्वे स्थानकांवर ३६ तासांचा तर ठाणे रेल्वे स्थानकावर ६३ तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
या तीन दिवसांच्या मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेच्या मार्गावरील ७२ मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी मराठवाड्यातून मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईतून मराठवाड्याकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या या मेगाब्लॉकच्या काळात रद्द करण्यात आल्या आहेत.
कोणती रेल्वे, कधी रद्द?
- नांदेडहून मुंबईला जाणारी १७६१८ तपोवन एक्सप्रेस ३१ मे व १ जून रोजी रद्द करण्यात आली आहे.
- मुंबईहून नांदेडला जाणारी १७६१७ तपोवन एक्सप्रेस १ ते २ जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
- जालन्याहून मुंबईला जाणारी २०७०५ वंदेभारत एक्स्प्रेस १ व २ जून रोजी रद्द करण्यात आली आहे.
- मुंबईहून जालन्याला जाणारी २०७०६ वंदेभारत एक्स्प्रेस १ ते २ जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
- मुंबईहून नांदेडला जाणारी १७६१२ राज्यराणी एक्स्प्रेस १ व २ जून रोजी रद्द करण्यात आली आहे.
- नांदेडहून मुंबईला जाणारी १७६११ राज्यराणी एक्स्प्रेस ३१ मे व १ जून रोजी रद्द करण्यात आली आहे.
- हैदराबादहून मुंबईला जाणारी १२७०२ क्रमांकाची गाडी ३१ मे आणि १ जून रोजी रद्द करण्यात आली आहे.
- हिंगोली- मुंबई रेल्वे १ आणि २ जून रोजी मनमाडपर्यंतच धावेल.
- मुंबई-हिंगोली ही रेल्वे गाडी १ व २ जून मनमाडहून सुटेल आणि हिंगोलीकडे मार्गक्रमण करेल.
- बल्लारशाहून सीएसटीला जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस दादरपर्यंतच धावेल.