तंत्र शिक्षण मंडळाने निकाल राखून ठेवलेल्या व नापास विद्यार्थ्यांना पुन्हा संधी, २३ ऑगस्ट रोजी होणार पुरवणी परीक्षा


मुंबई:  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल राखून ठेवलेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थी यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे. कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यासंदर्भात निर्देश दिले. त्यानुसार २३ ऑगस्ट रोजी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या जुलै २०२५  सत्रातील २,१५२ विद्यार्थ्यांना परीक्षेत नियमभंग केल्याच्या कारवाईत त्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ सत्रातील परीक्षा एआय आधारित  प्रॉक्टोरेड तंत्रज्ञान वापरून एमसीक्यू स्वरूपात घेण्यात आल्या. ७ जुलै २०२५ रोजी परीक्षा संपल्यानंतर १७ जुलै २०२५ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या सत्रात ३६ हजार २०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २ हजार १५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा नियमभंग केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले.

त्यापूर्वी झालेल्या सराव परीक्षेत विद्यार्थ्यांना एआय सुरक्षा व  प्रोक्टेरेड प्रणालीबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली होती. मात्र असे असतानाही परीक्षेत नियमभंग झाल्याचे आढळून आले होते. मंडळामार्फत प्रमाणपत्र, पदविका व प्रगत पदविका अभ्यासक्रम राबवले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळतात. केवळ नियमभंग या कारणास्तव विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिनाभरात फेर परीक्षा घेण्याचे आदेश मंडळाला दिले आहेत. त्यानुसार, २३ ऑगस्ट २०२५ रोजी पुरवणी परीक्षा आयोजित केली जात आहे. राखीव निकाल असलेले व अनुत्तीर्ण विद्यार्थी यांना ही विशेष संधी दिली जात आहे.

यापूर्वी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या सैद्धांतिक परीक्षा पारंपरिक स्वरुपात घेतल्या जात होत्या. या परीक्षांच्या निकालासाठी सुमारे २ महिने लागत होते. विद्यार्थ्यांचा वेळ वाचवा यासाठी मंडळाने अत्याधुनिक AI Proctored तंत्रज्ञान वापरून या परीक्षा MCQ स्वरूपात घेण्याचा निर्णय घेतला होता. पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जात असून यासंदर्भात मंडळामार्फत विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शक सूचना दिल्या जातात.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!