मुंबईः मोसमी वाऱ्याच्या पुढील वाटचालीसाठी सध्या पोषक स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळही पुढे सरकल्यामुळे मान्सूनचा मार्ग मोकळा झाला असून कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उद्या शुक्रवारपासून मोसमी पाऊस सुरू होईल. २४ आणि २५ जून रोजी पावसाचा जोर वाढेल. पुढील तीन दिवसांत राज्यभर मान्सूनच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
तळ कोकणात रखडलेला मान्सून आता लवकरच वेग घेईल. २३ जूनपासून राज्याच्या बहुतेक भागात पाऊस सुरू होईल. २४ आणि २५ जूनपासून पावसाचा जोर वाढलेला असेल. मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळे मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक मजबूत होत आहे. त्यामुळे विदर्भात चांगला पाऊस अपेक्षित आहे. अरबी समुद्रात थंडावलेल्या मोसमी वाऱ्याच्या शाखेलाही उर्जितावस्था येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात लवकरच पाऊस सुरू होईल. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काही कमी राहण्याची शक्यता आहे, असेही हवामानतज्ज्ञांनी म्हटले आहे.
२३ जूनपासून कोकणातील काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. २३ आणि २४ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे, असे भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी म्हटले आहे.
दरवर्षी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. यंदा तो ८ जून रोजी दाखल झाला. ११ जून रोजी मान्सून दक्षिण महाराष्ट्रात पोहोचला. मात्र त्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूच्या प्रवासाला ब्रेक लागला. मान्सून लांबल्यामुळे राज्यापुढे पाणी संकट आणि शेतकऱ्यांसमोर खरिपाच्या पिकांची पेरणी कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊसच न झाल्यामुळे राज्याच्या बहुतांश भागातील पेरण्या रखडल्या आहेत.