
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद): आपण खूप ‘प्रामाणिक’ अधिकारी असूनही विशिष्ट जातीतले लोक आपल्याविरुद्ध कुंभाड रचून आपणाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप करणाऱ्या आणि थेट सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांवरच जातीयवादाचा आळ घेणाऱ्या माजी प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त जयश्री रावण सोनकवडे यांच्याविरूद्ध अखेर छावणी पोलिसांनी मागासवर्गीय महिलांच्याच इच्छेविरुद्ध काम करून घेऊन त्यांचा छळ केल्याप्रकरणी तब्बल एक महिन्यानंतर गुन्हा दाखल केला. पुण्यातील पोलिसांच्या कार्यरतत्परचा मुद्दा चर्चेत आलेला असतानाच छत्रपती संभाजीनगर पोलिसांची ही ‘कार्यतत्परता’ही लक्षणीय ठरण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागाच्या प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्तपदावर कार्यरत असताना जयश्री रावण सोनकवडे यांनी आपल्याच प्रवर्गातील काममगार महिलांना ‘रावणा’चे भयंकर रुप दाखवून छळल्याचे प्रकरण समोर आले होते. पद आणि अधिकाराचा दुरूपयोग करत त्यांनी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कामगार महिलेला स्वतःच्या घरीच कामाला ठेवून घरगड्यासारखे राबवून घेतले. स्वतःबरोबरच आईसाठीही त्यांना राबवून घेतले. विशेष म्हणजे त्या कामगार महिलेने याबाबतची तक्रार आयुक्तांकडे केल्यानंतर सोनकवडेंनी त्या महिलेवर दबाव टाकून तिचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला.
सोनकवडे यांच्या छळाला कंटाळून चार महिला कामगारांनी छावणी पोलिस ठाण्यात सोनकवडे यांच्याविरुद्ध ९ जुलै रोजी छावणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. परंतु छावणी पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीला दाद दिली नाही. उलट गुन्हा दाखल करून नंतर याच फिर्यादी महिलांना नोटिसा बजावून अटक करण्याची तंबी देण्याचा ‘पराक्रम’ छावणी पोलिसांनी केला.
सोनकवडे यांनी वापरलेले दबाव तंत्र आणि छावणी पोलिसांनी दडपशाही करूनही पीडित महिलांनी हिम्मत सोडली नाही. त्या न्यायासाठी लढत राहिल्या. छावणी पोलिस ठाण्याचे अधिकारी आपल्या फिर्यादीला दाद देत नाहीत, असे लक्षात आल्यानंतर या पीडित महिला काही सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिस आयुक्तांना भेटल्या. पोलिस आयुक्तांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत छावणी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तरीही दोन दिवस त्या आदेशावर अंमल झाला नाही.
शेवटी बुधवारी रात्री छावणी पोलिसांना उपरती सूचली आणि त्यांनी एका कामगार महिलेच्या फिर्यादीवरून समाज कल्याण उपायुक्त जयश्री रावण सोनकवडे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १४६ (इच्छेविरुद्ध काम करण्यास भाग पाडणे), सन्मान किंवा प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याची धमकी देणे (३१५(२) आणि समान हेतुच्या पूर्ततेसाठी गुन्हेगारी कृत्य करणे (३(५) या कलमान्वये एफआयआर दाखल केला.
चौकशीचा फेरा, एपीआय प्रभारी कसा?
छावणी पोलिस ठाणे हे शहरातील संवेदनशील आणि महत्वाच्या पोलिस ठाण्यांपैकी एक पोलिस ठाणे आहे. लष्करी भागात असलेल्या या पोलिस ठाण्याचा प्रभार चक्क एका सहायक पोलिस निरीक्षकाकडे आहे. शहरातील अन्य पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक १ आणि २ दर्जाचे अधिकारी कार्यरत असताना छावणीचा प्रभारी अधिकारी असलेल्यृ सहायक पोलिस निरीक्षकाने या पीडित महिलांनी महिनाभरापूर्वी फिर्याद देऊनही त्यांच्या फिर्यादीचा दखल घेतली नाही. परवा या पीडित महिला पोलिस आयुक्तांना भेटल्या. त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही गुन्हा दाखल करणे तर सोडाच छावणीच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी समाज कल्याणच्या कार्यालय अधीक्षकांना पत्र लिहून १२ प्रश्न विचारले.
महिलांच्या छळाबाबत कुठलीही तक्रार असेल तर आधी एफआयआर नोंदवून घेऊन मगच सखोल चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही छावणी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी चौकशीचा ससेमिरा लावून पीडित महिलांचे धैर्य खच्चीकरण्याचा प्रयत्न केला. तरीही या पीडित महिला मागे हटल्या नाहीत. त्यामुळे अखेर छावणी पोलिसांना एका पीडित महिलेच्या फिर्यादीवरून जयश्री रावण सोनकवडे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करावाच लागला.
…तेव्हा चौकशी का नाही केली?
चार पीडित कामगार महिला छावणी पोलिस ठाण्यात आपल्याविरुद्ध फिर्याद द्यायला गेल्याची खबर मिळताच जयश्री रावण सोवकवडे या छावणी पोलिस ठाण्यात गेल्या. छावणी पोलिसांनी त्यांनी विशेष ट्रीटमेंट दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून छावणी पोलिसांनी तत्परतेने लगेचच एफआयआर दाखल करून घेतला. तेव्हा या प्रकरणाची चौकशी करून एफआयआर दाखल केला पाहिजे, असे छावणी पोलिसांना वाटले नाही. मग चार पीडित महिलांची फिर्याद प्राप्त होऊन महिना उलटला तरी छावणी पोलिसांनी चौकशीचा फार्स कशासाठी केला? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.
पीडित महिलांचे म्हणणे काय?
‘ मी समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृह यूनिट क्रमांक ४ मध्ये २०२३ पासून सफाई कामगार म्हणून काम करते. गृहप्रमुख वैशाली काळसरे यांच्या सांगण्यावरून मी उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या घरी कामाला गेले. काळसरे यांनी तेथे सोनाली बागुल यांनाही पाठवले. सोनकवडे आमच्याकडून सतत काम करून घेत. दहा मिनिटे सुद्धा आराम करून देत नसत. त्या दररोज स्वतःबरोबरच त्यांच्या आईची माझ्याकडून मसाज करून घ्यायच्या. कधी फ्रीज, कधी फरशी तर कधी झाडांची पाने पुसायला सांगत. सततच्या कामामुळे माझ्या उजव्या हाताला मोठी गाठ झाली आहे. या गाठीमुळे मला त्रास होत आहे’.
‘उपायुक्त सोनकवडे या एवढे काम करून घेतल्यानंतर त्या अपमानास्प वागणूक देत. घरात पाणीसुद्धा पिऊ देत नसत. आम्ही बसलो तर घाण होईल म्हणत बसूही देत नसत. त्या आमच्यावर दया करत नव्हत्या. उलट नाटक करता, बावळट बायका असे म्हणत त्या हिणवत होत्या. घरचे काम केले नाहीतर त्या कामावरून काढून टाकण्याची धमकी देत. त्यामुळे आम्ही काम करत होतो. यापूर्वी त्यांनी तीन महिलांना कामावरून काढून टाकले आहे’. ही कैफियत पीडित कामगार महिलेने जयश्री सोनकवडे यांच्या ‘रावण’कृत्याची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्यावि भागीय चौकशी समितीसमोर मांडली. त्यानंतर सोनकवडे यांनी पीडित कामगार महिलेला फोन करून दमबाजी करण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु पीडित कामगार महिला न्याय मिळवण्याच्या भूमिकेवर अखेरपर्यंत ठाम राहिल्यामुळे जयश्री सोनकवडे यांचे ‘रावण’कारनामे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

